सायबांचा बालेकिल्ला आणि जंगी बार!

सायबांचा बालेकिल्ला आणि जंगी बार!

डोक्याला शॉट संपादकीय

तिकिट तिकिट करत कंडक्टर पक्या फोमणसकरच्या सीटकडे आला.

…पक्या फोमणसकरने दहा रूपयांची नोट पुढे केली…

…कंडक्टर म्हणाला, कुठे?…

…पक्या फोमणसकर दरडावत म्हणाला, कुठे काय कुठे?…साहेबांच्या बालेकिल्ल्यात…

…कोण साहेब?…कुठला बालेकिल्ला??…कंडक्टरसुध्दा पक्यावर गुरकला…

…ए शहाण्या, साहेब…साहेब…आमचे साहेब…त्यांच्या येरियातनं बस नेेतो…आणि वर तोंड वर करून विचारतो, साहेब कोण म्हणून?…पक्या पण कंडक्टरवर जाम गुरकला…

…पक्याच्या हुलपट्टीवर भाबडा कंडक्टर एकदम बंद झाला…

…ही हात जोडलेली सगळी बॅनर्स दिसतायत ना बाहेर?…ती आमच्या साहेबांची…कळलं काय?…पक्याने फिनिशिंग टच दिल्यासारखी पुन्हा एक ठसन दिली…

…कंडक्टर जुन्या शिवसेनेने साफ बंद करावा अगदी तसा बंद झाला…

…हे बघ…आमचे साहेब लाखालाखाचा लिड घेऊन इथून निवडून आले आहेत…दोनदा पडले पण दोन-चार हजारांनी…पडताना पण मस्त शानमध्ये पडले…कळलं काय…पक्या आता फॉर्मातच आला…

…ठीक आहे ओ…पण तुम्हाला उतरायचंय कुठे ते तर सांगा?…कंडक्टर खालच्या पट्टीत म्हणाला…

…अरे?…पुन्हा विचारतो, कुठे?…सांगितलं ना बालेकिल्ला?…पक्याची पुन्हा सटकली…

…तुम्हाला टोळकेकरांच्या जनसंपर्क कार्यालयाकडे उतरायचं आहे का?…कंडक्टरने नरमाईची पट्टी खूपच खाली नेली…

…हां…बघितलं?…आता कसा आला लायनीवर?…सुरूवातीपास्नं सांगतोय साहेबांचा बालेकिल्ला…तर कळतच नव्हतं त्याला…पक्याला लढाई जिंकल्याचा आनंद झाला…

…अहो, आम्हाला गरीबांना नकाशावर कळत नाही आमचा जिल्हा…तर आम्हाला काय कळणार ओ बालेकिल्ला?…कंडक्टर नरमाईनेच बोलला…

…अरे, बालेकिल्ला म्हणजे साहेबांचा हमखास निवडून यायचा येरया…साहेबांनी निवडणुकीला उभं राहायची नुसती घोषणा जरी केली तरी लोक ठपाठप मतं टाकायला तयार असतात…पक्याने कंडक्टरची शाळा घ्यायला सुरूवात केली…

…काय म्हणता?…कंडक्टर पेढा खाऊन वेडा झाला.

…काय म्हणता, काय म्हणता काय?…साहेबांचा निवडणुकीचा फॉर्म भरायलाच लाखालाखाने पब्लिक जातं…हे ट्रॅफिक जाम होतं इथे…पक्याने शाळेचा तास सुरूच ठेवला…

…हो नाही?…साहेबांनी करूनसुध्दा ठेवलं असेल ना तितकं पब्लिकसाठी?…कंडक्टरने भोळाभाबडा प्रश्न विचारला.

…हे शौचालय दिसतंय का शौचालय?…ते कुणी बांधलं?…साहेबांनीच बांधलं…पक्याने उत्सुकतेने माहिती पुरवली…

…आपण आता जिथून चालोय ना, तो फ्लायओव्हर कोणी बांधला माहीताय का?…पक्याने छातीठोक विचारलं…

…अर्थातच, साहेबांनी…कंडक्टरसुध्दा छातीठोक उत्तरला…

…मागे शाळा गेली बघा शाळा…ती कोणी बांधलीय माहीताय का?…पक्याने इच्छित उत्तराच्या अपेक्षेने प्रश्न केला…

…अहो, तुमच्याच साहेबांनी…कंडक्टरने पक्याची अपेक्षा पूर्ण करण्यात कसूर केली नाही…

…ते तिकडचं हॉस्पिटल माहीत आहे?…ते कोणी बांधलंय?…पक्याने अपेक्षेने प्रश्न केला.

…आणखी कोण बांधणार हो?…साहेबांशिवाय कोण आहे का?…पक्याचे एकवीस अपेक्षित प्रश्न बंद व्हावेत म्हणून कंडक्टरने गुगली टाकून पाहिला…

…ते डिट्टो तिरूपतीसारखं मंदिर कोणी बांधलंय?…पक्या कंडक्टरच्या गुगलीला बधलाच नाही.

…ते मार्केट कोणी बांधलं?…ते वाचनालय कोणी बांधलं?…तो वृध्दाश्रम कोणी बांधला?…ते योगमंदिर कोणी बांधलं?…ते अमकं कोणी बांधलं आणि ते तमकं कोणी बांधलं?…पक्या फोमणसकर कंडक्टरला सोडायला अजिबात तयार नव्हता…

…कंडक्टरसुध्दा तुमच्याच साहेबांनी, तुमच्याच साहेबांनी करून थकला होता…

…बरं, पक्या फोमणसकरचा स्टॉपसुध्दा बराच लांब होता…तोपर्यंत पक्याने आपल्याला पूर्ण ताब्यात घेतला आहे हे कंडक्टरला व्यवस्थित कळून चुकलं होतं.

…पक्याच्या तावडीतून आपली सुटका कशी करावी हे कंडक्टरच्या लक्षातच येत नव्हतं…

…कंडक्टरने पक्याच्या तोंडावर चार लांब पल्ल्याच्या जांभया देऊन पाहिल्या…पण पक्यावर त्याचाही काही परिणाम झाला नाही…

…शेवटी ट्रॅफिकमध्ये बस थांबली तेव्हा ब्ल्यू बर्ड नावाचा एक जंगी बार कंडक्टरला दिसला…आणि त्या बारसमोर हे पार्किंग दिसलं…

…कंडक्टर म्हणाला, ह्या बारसमोर जे गाड्यांचं पार्किंग होेतं त्यामुळे आमच्या बसला पुढे जायला खूप अडचण येते हो…हा बार कुणी बांधला?…

…भरात आलेला पक्या म्हणाला, कुणी म्हणजे काय?…आमच्याच साहेबांनी…

…पक्याने हे उत्तर दिलं खरं, पण पुढच्याच क्षणी पक्या हडबडला…आणि साहेबांचा बालेकिल्ला येण्याच्या स्टॉपआधीच बसमधून खाली उतरला…

…कंडक्टरने सुटकेचा नि:श्वास टाकला…

First Published on: February 25, 2019 8:55 PM
Exit mobile version