…त्यांना म्हणतात लोक!

…त्यांना म्हणतात लोक!

डोक्याला शॉट लेख

लोक लोक म्हणजे कोण तर ज्यांना चार लोक ओळखतात ते लोक…लोक ह्या संकल्पनेची अशी एक सर्वसाधारण व्याख्या असावी.

..काही माणसं ही चार लोकांमधूनच आलेली असतात…पण चार लोकांसारखी नसतात…

…ती भाजीबाजारात जात नाहीत…त्यामुळे त्यांना शेपुच्या भाजीची किंमत माहीत नसते…

…त्यांना लोकलच्या गर्दीत रासवटपणे घुसण्याचा दोन पैशांचा अनुभव नसतो…त्यांना विन्डो सीट मिळण्यात काय सुख असतं त्याची माहिती नसते…

…कारण ती राजकारणातली सेलिब्रिटी असतात…त्यांच्यासोबत त्यांच्या दिमतीला चार माणसं असतात…आणि ती चार माणसं हे त्यांचं क्वालिफिकेशन असतं…

…लोक लोक म्हटले जातात ते मात्र वेगळे असतात…कामावरून सुटल्यावर त्यांचे पाय आपसुक भाजीबाजाराकडे वळतात…आणि घरी जाताना ते कधीमधी आपल्या कच्च्याबच्च्यांना दहा रूपयांचं डेअरी मिल्क घेऊन जातात…त्यासाठी शेअरिंग रिक्षासुध्दा टाळतात

…त्यांना पोराबाळांच्या शाळाकॉलेजच्या अ‍ॅडमिशनसाठी घराजवळच्या पुढार्‍याचं कार्यालय गाठावं लागतं…तो पुढारी अपरात्री येईपर्यंत कुठल्यातरी कोपच्यात दगडासारखं निपचित बसून राहावं लागतं…

…महागाईच्या झळा पोहोचायला लागल्यावर ते एकूणएक लोक राजकारण्यांच्या नावाने कडाकडा बोटं मोडतात…पण महागाईविरूध्द निघालेल्या मोर्चात कधीच सहभागी होत नाहीत…

…ते सरकारी पक्षातही नसतात…विरोधी पक्षांच्याही वळचणीला जात नसतात…तिसर्‍या, चौथ्या आघाडीलाही जमेत धरत नसतात…

…पुढारी मंडळी आपल्या भाषणात जे मायबाप जनता म्हणतात ते खरे तेच लोक असतात…पण आपण त्यांचे अनौरस नसून खरे मायबाप आहोत हे रोजच्या धकाधकीत त्यांच्या गावीही नसतं…

…निवडणुकीत त्यांची भूमिका बघ्याची असते…ते निवडणूक ह्या प्रकाराची लांबूनच मजा घेत असतात…

…त्यांना राजकारण खोलात जाऊन माहीत नसतं…आणि तितकं खोलात त्यांना उतरायचंही नसतं…

…त्यांना कायम काठावर राहायचं असतं…पण काठावर राहूनच नको असलेल्यांचं विसर्जन करायचं असतं…

…आणि एकाला कंटाळलो म्हणून दुसर्‍याचा पुन्हा जीर्णोध्दार करायचा असतो…

…एखाद्या वेळेस दगडापेक्षा वीट मऊ लागली नाही म्हणून त्याच दगडाला त्यांना शेंदूर फासायचा असतो…

…एखाद्या वेळेस सगळीकडेच तुडुंब भक्ती वाहते आहे म्हणून वाहत्या भक्तीत त्यांना स्वत:ला शाम्पू लावून घ्यायचा असतो…

…कारण त्यांना आपल्या लोक ह्या संकल्पनेच्या पुढे कदापि जायचं नसतं…कारण जग कितीही ग्लोबल झालं तरी आपण लोकल लोक आहोत हेच त्यांच्यासाठी पुरेसं असतं…
– अँकर

First Published on: March 1, 2019 4:50 AM
Exit mobile version