घराणेशाहीला पर्याय नाही!

घराणेशाहीला पर्याय नाही!

डोक्याला शॉट लेख

तिकडून कुणी म्हणालं, माझ्या मुलाला तिकीट द्या…इकडून लगेच कुणीतरी म्हणालं, माझ्यासुध्दा मुलीला तिकीट द्या.

…त्या तिकडून पलीकडून पटकन कुणी तरी कुणाच्या तरी कानात कुजबुजलं…माझ्या मुलाला नको, पण माझ्या सुनेला तरी तिकीट द्या…

…मग हळुच माळ्यावरून आवाज आला…माझा पुतण्या काही कमी नाही, त्याला कोणत्याही परिस्थितीत तिकीट द्याच, तो आकाशपाताळ एक करील, पण विरोधी उमेदवारापेक्षा एक मत जास्त घेऊन दाखवेलच…

…थोड्या वेळाने आजुबाजूच्या वातावरणात एकच गलका वाढू लागला…जो तो आपली भाची, आपला जावई, आपला साडू, आपली मेहुणी, आपला शेजारी, आपला ड्रायव्हर आणि कुणाकुणासाठी तिकीटं मागू लागला…

…सगळ्यांनी कुजबुजतच तिकीटं मागितली…पण त्या कुजुबुजीचा कोरस दिल्लीच्या तख्ताला ऐकू गेला…

…तशी नवी दिल्ली म्हणजे गेल्या पाच वर्षांतली नव्याने निवडून आलेली दिल्ली खवळली…ती म्हणाली, आमच्या छापाच्या लोकशाहीमध्ये तुमची घराणेशाही चालणार नाही…

…सगळ्यांनी माना टाकल्या आणि टाकलेल्या मानेनेच ते नवी दिल्लीभोवती शोकसभेला उभं राहिल्यासारखे स्तब्ध उभे राहिले…नवी दिल्लीच्या नीतीमत्तेची दहशतच इतकी मोठी होती की कुणीच काही बोललं नाही…

…मग नव्या दिल्लीनेच ती जिवंत माणसांची भयाण शांतता दूर करत म्हटलं…मी जेव्हा माझ्या भाषणातून विरोधकांच्या घराणेशाहीची पिसं काढते तेव्हा माझ्या पायाखाली घराणेशाही असून कसं चालेल?…

…नवी दिल्लीभोवतीच्या सगळ्या घराणेशहांनी नवी दिल्लीचे हे क्रांतिकारी विचार ऐकले…आणि ते स्तब्धपणे आपल्या आलिशान कार्यालयात परतले…

…आपल्या मुलाला, आपल्या मुलीला, आपल्या सुनेला, आपल्या जावयाला, आपल्या मेहुण्याला जर नवी दिल्लीने तिकीट न द्यायचं ठरवलं तर तिकीट काय आपल्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना, निष्ठावंत अनुयायांना देणार की काय?…ज्याच्या त्याच्या निष्ठावंत मनाला फार प्रामाणिक प्रश्न पडला…

…मग आपण इतके दिवस पक्षाची सेवा केली ती काय कार्यकर्त्यांना नेते करण्यासाठी की काय?…त्यांचं नेतृत्व स्वीकारण्यासाठी की काय? सगळ्यांनाच चिंता भेडसावू लागली…

…इकडे नवी दिल्लीलाही निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या झोळीत निष्ठेखेरीज निवडणुकीसाठी दुसरं काही सापडलं नाही…मग त्यांच्यापुढेही मुलगा, मुलगी, सून, जावई, मेहुणा ह्यांना तिकीट देण्याखेरीज दुसरा पर्याय उरला नाही…

…हळुहळू नवी दिल्ली घराणेशाहीविरुध्द बोलायची बंद झाली…

-अँकर

First Published on: March 30, 2019 4:41 AM
Exit mobile version