सत्तेत नसूनही एकनाथ गायकवाडांची संपत्ती ९ पट वाढली!

सत्तेत नसूनही एकनाथ गायकवाडांची संपत्ती ९ पट वाढली!

एकनाथ गायकवाड

दक्षिण मध्य मुंबईच्या दोन्ही प्रमुख उमेदवारांनी अर्थात काँग्रेस आघाडीकडून एकनाथ गायकवाड तर भाजप-शिवसेना युतीकडून राहुल शेवाळे यांनी सोमवारी मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी दोन्ही पक्षांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. मात्र, यापैकी एकनाथ गायकवाड हे २०१४मध्ये आलेल्या मोदी लाटेमध्ये राहुल शेवाळेंकडून पराभूत झाले होते. त्यामुळे ते गेल्या ५ वर्षांमध्ये सत्तेपासून दूर जरी राहिले असले, तरी या काळात त्यांच्या वैयक्तिक संपत्तीमध्ये तब्बल ९ पटींहून जास्त वाढ झाल्याचं समोर आलं आहे. उमेदवारी अर्जासोबत त्यांनी जोडलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही बाब स्पष्ट झाली आहे. त्यामुळे सत्तेपासून दूर असून देखील वैयक्तिक संपत्तीमध्ये ९ पट वाढ कशी होऊ शकते? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

उत्पन्न ७५ लाख १६ हजारांच्या घरात!

एकनाथ गायकवाड यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये दिलेल्या माहितीनुसार २०१३-१४ या आर्थिक वर्षामध्ये त्यांचं वैयक्तिक उत्पन्न वर्षाला ८ लाख ४ हजार ८३ रुपये इतकं होतं. पण तेच २०१७-१८ या आर्थिक वर्षापर्यंत तब्बल ७५ लाख १६ हजार ४८९च्या घरात जाऊन पोहोचलं आहे. विशेष म्हणजे नेमके ते खासदार नसताना त्यांचं उत्पन्न इतकं वाढलं कसं? अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यातही विशेष बाब म्हणजे याच काळात त्यांच्या पत्नीचं, म्हणजेच ललिता गायकवाड यांचं वार्षिक उत्पन्न कमी झालं आहे. २०१३-१४ या काळात त्यांचं वार्षिक उत्पन्न ५ लाख ४८ हजार ६५ इतकं होतं. तेच २०१७-१८मध्ये ३ लाख २३ हजार ५५५ म्हणजेच सुमारे २ लाखांनी कमी झालं आहे.

एकनाथ गायकवाड यांच्या संपत्तीत ९ पट वाढ

नोटबंदीच्या वर्षी उत्पन्न घटलं?

दरम्यान, एकनाथ गायकवाड यांच्या वाढलेल्या उत्पन्नामध्ये देखील अनेक बाजू दिसून येतात. सुरुवातीला ८ लाखांच्या घरात असलेलं त्यांचं उत्पन्न २०१४-१५मध्ये १३ लाख ९६ हजार झालं. त्याच्याच पुढच्या वर्षी ते थेट ६२ लाख २० हजारांपर्यंत म्हणजेच सुमारे ५ पट वाढलं. तर लगेचच पुढच्या वर्षी म्हणजे नोटबंदीच्या वर्षी ते २६ लाख ८१ हजार ३३६पर्यंत खाली आलं. आणि आता गेल्या वर्षी पुन्हा वाढून ७५ लाखांवर गेलं! दरम्यान, त्यांच्या नावावर २ कोटी ३८ लाख १८ हजार ६९४ रुपयांची शेतजमीन असून १७ कोटी ५० लाख २७ हजार ८७१ रुपये किंमतीची मालमत्ता आहे. त्यांच्यावरचं एकूण कर्ज २ कोटी रुपये असून त्यांच्या पत्नीवरचं कर्ज ४१ लाख ५० हजारांच्या घरात आहे.


हेही वाचा – ‘अशा’ होणार राज्यातल्या ४८ लोकसभा लढती!

First Published on: April 8, 2019 5:55 PM
Exit mobile version