राहुल गांधी आज मुंबईत

राहुल गांधी आज मुंबईत

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचा प्रचाराचा नारळ शुक्रवारी मुंबईत फुटणार आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी शुक्रवारी मुंबईत दाखल होणार असून वांद्रे येथील एमएमआरडीएम मैदानात विशेष सभा घेणार आहेत. या सभेसाठी काँग्रेस पक्षाने कंबर कसली असून गुरुवारी मुंबईत जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार आहेत. पुलवामा येथे झालेला दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारतीय हवाई दलाने केेलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी काय बोलतात ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने आतापासून तयारी सुरु केली आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची देशभरात विविध ठिकठिकाणी सभा आयोजित केली जाणार आहे. त्याची सुरुवात शुक्रवारी मुंबईतून होणार असून या सभेला राज्यातील अनेक नेते हजेरी लावणार आहेत. या सभेची जबाबदारी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम आणि माजी खासदार मिलिंद देवरा यांच्यावर देण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर निरुपम आणि देवरा यांनी इतर नेत्यांसह नुकतीच एमएमआरडीए ग्राऊंड येथे भेट देऊन सभेच्या तयारीचा आढावा घेतला.

या सभेच्या तयारीबद्दल बोलताना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले की, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची मुंबईत होणारी जाहीर सभा आम्हाला ऐतिहासिक बनवायची आहे आणि हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन आम्ही काँग्रेसचे सर्व नेते व कार्यकर्ते काम करत आहोत. काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मुंबईतील तमाम जनता राहुल गांधी यांच्या सभेला उपस्थित राहुन, राहुलजींना ऐकण्यासाठी उत्सुक आहेत. गेली साडेचार वर्षे आपण भाजप सरकारचा कारभार पाहत आहोत. भाजप सरकार सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षांवर खरे उतरण्यात अपयशी ठरले आहे. भाजप सरकारच्या अपयशावर आणि त्रुटींवर या सभेमध्ये राहुल गांधीजी प्रकाश टाकणार आहेत आणि म्हणूनच आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची मुंबईत होणारी सभा अत्यंत महत्वाची आहे.

माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनीही संजय निरुपम यांच्या बोलण्याला दुजोरा दिला. ते म्हणाले की, संपूर्ण मुंबई काँग्रेस राहुल गांधी यांची सभा यशस्वी करण्याच्या दृष्टीने एकत्र येऊन काम करत आहे आणि यापुढेही आम्ही सर्व एकत्र येऊन काम करत राहणार आहोत. यावेळेस संजय निरूपम आणि मिलिंद देवरा यांच्या सोबत ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या महाराष्ट्र प्रभारी सचिव सोनल पटेल, ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सचिव आशिष दुवा, माजी खासदार एकनाथ गायकवाड, आमदार वर्षा गायकवाड, नसीम खान यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

First Published on: March 1, 2019 4:38 AM
Exit mobile version