कोल्हापूरातून संजय मंडलिक, तर धैर्यशील  माने हातकणंगलेत शिवसेनेचे उमेदवार

कोल्हापूरातून संजय मंडलिक, तर धैर्यशील  माने हातकणंगलेत शिवसेनेचे उमेदवार

Sanjay Mandlik

कोल्हापुरातून प्रा. संजय मंडलिक व हातकणंगलेतून धैर्यशील माने यांची उमेदवारी शिवसेनेने निश्चित केली आहेकोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही लोकसभेच्या जागा वर्षानुवर्षे शिवसेना लढवित आहे. आगामी निवडणुकीतही या दोन्ही जागा शिवसेनेकडेच राहतील, त्या बदलण्याचा अथवा कुणासाठी सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी घोषणा  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीयेथे जिल्ह्यातील आमदार, पदाधिकारी व तालुका प्रमुखांची संयुक्त बैठक झाली. तासभर झालेल्या या बैठकीत दोन्ही मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत ठाकरे यांनी दोन्ही जागा शिवसेनेकडेच राहणार असल्याचे स्पष्ट केल्यामुळे उमेदवारीवरुन युतीमध्ये सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. भारतीय जनता पक्षाने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर दावा केला होता. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मुंबईतील बैठकीकडे लक्ष लागून होते. 

जिल्ह्यातील दोन्ही जागा या शिवसेनेच्या हक्काच्या आहेत. वर्षानुवर्षे शिवसेना या ठिकाणी लढत आहे. यामुळे जागा बदलण्याचा प्रश्न उद्भवत नाही. जिल्ह्यातून शिवसेनेचे दोन्ही खासदार निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रचाराला लागावे. भाजप सोबत आहे. दोन्ही मतदारसंघातील भाजप नेत्यांसोबत बैठक घेऊ. शिवाय कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही मतदारसंघात माझ्या सभा होतील. कार्यकर्त्यांनी मनात कसलीही शंका न ठेवता निवडणुकीच्या कामाला लागवे. पक्षाकडून जी मदत लागेल, ती मिळेल.’, असे उद्धव म्हणाले.

आमदार राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, सुजित मिणचेकर, प्रकाश आबिटकर,उल्हास पाटील, माजी खासदार निवेदिता माने, कोल्हापूरचे संभाव्य उमेदवार प्रा. संजय मंडलिक, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव, हातकणंगलेचे संभाव्य उमेदवार धैर्यशील माने, उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, प्रा. शिवाजी पाटील, बाजीराव पाटील, करवीर तालुकाप्रमुख विराज पाटील यांच्यासह अन्य तालुकाप्रमुख व प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत ठाकरे यांनी चर्चा केली. बैठकीला खासदार अनिल देसाई, दिपक सावंत, मिलिंद नार्वेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

महाडिक व शेट्टींना थारा नाही 

हातकणंगले लोकसभा मतदारसंघही शिवसेना लढवित आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार राजू शेट्टी हे युतीचे मित्र पक्ष होते, म्हणून शिवसेनेने ती जागा सोडली होती. यावर्षी इतरांना जागा सोडण्याचा प्रश्नच नाही. यंदाही शेट्टी संपर्क साधत होते, मात्र आमचा उमेदवार नक्की होता. प्रा. संजय मंडलिक हे कायम शिवसेनेबरोबर आहेत. जागा आमच्या आहेत, उमेदवार निश्चित आहेत. यामुळे कार्यकर्त्यांनी मनात कसलीही शंका न ठेवता कामाला लागावे. गेल्या निवडणुकीत खासदार धनंजय महाडिक, शिवसेनेत येतो येतो म्हणाले, शेवटपर्यंत झुलवत ठेवले. त्यांचा अनुभव चांगला नाही. पक्षाचे उमेदवार असताना दुसऱ्यांच्या नावाचा विचार करण्याचा संबंधच नाही, असा टोलाही ठाकरे यांनी चर्चेत महाडिक व शेट्टी यांना लगाविल्याचे समजते

First Published on: March 2, 2019 4:22 AM
Exit mobile version