कृपया पवारांना भाजपमध्ये घेऊ नका – उद्धव ठाकरे

कृपया पवारांना भाजपमध्ये घेऊ नका – उद्धव ठाकरे

शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे

‘माझी देवेंद्र फडणवीसांना एक विनंती आहे. एवढं सगळं झाल्यानंतर आता कृपया शरद पवारांना पक्षात घेऊ नका. ही काय लायकीची माणसं आहेत, ते आपल्याला माहिती आहे’, अशी बोचरी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांवर केली आहे. कोल्हापूरमध्ये संयुक्त सभेदरम्यान युतीच्या प्रचाराचा नारळ फुटला. यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांनी सभेपूर्वी कोल्हापूरच्या देवीचं देखील दर्शन घेतलं. या सभेला उद्धव ठाकरे यांच्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, रामदास आठवले. सदाभाऊ खोत, जोगेंद्र कवाडे आदी नेतेमंडळी उपस्थित होते.

‘आम्ही सगळ्यांचे लाड करतो’

शरद पवारांवर टीका करतानाच उद्धव ठाकरेंनी यावेळी अजित पवारांवरही शेलक्या शब्दांमध्ये निशाणा साधला. ‘राष्ट्रवादी काँग्रेसला मतं द्यायची असतील, तर अजित पवार धरणं कशी भरणार होते ते आठवतंय ना?’ असा उपरोधिक प्रश्न त्यांनी उपस्थितांना करत अजित पवारांवर टीका केली. तसेच, ‘पवार म्हणतात दुसऱ्यांच्या पोरांचे लाड मी का करावेत? पण आमचे तसे संस्कार नाहीत आम्ही सगळ्यांचे लाड करतो’, असं म्हणत त्यांनी शरद पवारांना प्रत्युत्तर देखील दिले.

नरेंद्र पाटील शिवसेनेत

दरम्यान, यावेळी माथाडी कामगार नरेंद्र पाटील यांच्या शिवसेना प्रवेशाची देखील त्यांनी घोषणा केली. ‘मी खासकरून साताऱ्यासाठी नरेंद्र पाटील यांना मागून घेतलं आहे’, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

First Published on: March 24, 2019 9:13 PM
Exit mobile version