तेलंगणात तिरंगी लढत

तेलंगणात तिरंगी लढत

तेलंगणा

तेलंगणातील लोकसभेच्या १७ जागांसाठी येत्या ११ एप्रिलला पहिल्या टप्प्यात मतदान होत आहे. तेलंगणात तेलंगणा राष्ट्रीय समिती (टीआरएस), काँग्रेस आणि भाजप अशी तिरंगी लढत होणार आहे. २०१८ सालच्या डिसेंबर महिन्यात तेलंगणात विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. त्यात चंद्रशेखर राव यांच्या टीआरएस पक्षाने बहुमत मिळवले होते. विजयाची ही मालिका आगामी लोकसभा निवडणुकीतही कायम ठेवण्याचे राव यांनी ठरवले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत १७ पैकी १६ जागा आपण जिंकणारच असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. राव यांनी हैदराबादेची एक जागा ओवेसींना दिली आहे. या निवडणुकीत मोठे यश संपादन करणार असल्यामुळे केंद्रातील सरकार बनवण्यातही टीआरएस महत्त्वाची भूमिका बजावेल असा आशावाद राव यांनी व्यक्त केला आहे. दुसर्‍या बाजूला भाजपलाही तेलंगणामध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे, तर काँग्रेसची मदार ही आपल्या पारंपरिक मतदारांवर आहे.

उमेदवारांचा विक्रम आणि बॅलेट पेपर

तेलंगणातील निवडणूक यावर्षी वेगळ्याच कारणांमुळे संपूर्ण देशाच्या लक्षात राहणार आहे. तेलंगणातील निझामाबाद मतदारसंघात यावर्षी मतदारसंघातून तब्बल १८५ जण लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे या मतदारसंघात ईव्हीएम मशीनऐवजी बॅलेट पेपरने मतदान घेतले जाणार आहे. या १८५ जणांची नावे सामावून घेण्यासाठी निवडणूक आयोगाला जम्बो साईजचा बॅलेट पेपर बनवावा लागला आहे. तसेच मोठ्या आकारच्या मतदान पेट्यांचीही सोय करावी लागली आहे. निझामाबाद हा मतदारसंघ तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची कन्या के. कविता यांचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघातील शेतकरी हे प्रामुख्याने हळदीचे पीक घेतात, पण त्यांच्या हळदीला योग्य भाव मिळाला नाही. त्यामुळे या शेतकर्‍यांनीही निवडणूक लढवण्याचे ठरवले. परिणामी राज्य सरकारचा निषेध म्हणून १७५ शेतकर्‍यांनी उमेदवारीसाठी अर्ज भरला. त्यामुळे या मदारसंघात १८५ उमेदवार निवडणुकीसाठी उभे राहिले आणि त्यांनी एक विक्रम केला. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणात उमेदवार निवडणुकीसाठी उभे राहिल्यामुळे येथील निवडणूक आयोगाचे धाबे दणाणले. कारण ईव्हीएम मशीनमध्ये (चार ईव्हीएम मशीन एकत्र जोडल्यास) नोटासह ६४ उमेदवारांची नावे राहू शकतात, पण १८५ उमेदवारांसाठी बॅलेट पेपरशिवाय पर्याय नाही. त्यामुळे १५ लाख बॅलेट पेपरच्या छपाईचे काम येथील मुख्य निवडणूक अधिकार्‍यांना हाती घ्यावे लागले आहे, पण इतक्या मोठ्या संख्येने येथे उमेदवार उभे राहण्याची ही पहिलीच वेळ नाही. १९९६ साली निझामाबाद मतदारसंघातून २४५ उमेदवार निवडणुकीसाठी उभे राहिले होते.

तेलंगणातील मतदारसंघ

१- अदिलाबाद, २ -पेड्डापल्ले, ३- करिमनगर, ४ – निझामाबाद, ५ – झहिराबाद, ६- मेडक, ७ – मलकाजगिरी, ८ – सिकंदराबाद, ९ – हैदराबाद, १० – चेवेल्ला, ११ – मेहबूबनगर, १२ – नगरकुनूल, १३ – नालगोंडा, १४ – भोंगीर, १५ – वारंगल, १६ – मेहबूबाबाद, १७ -खम्माम.

तेलंगणातील मतदार

तेलंगणात लोकसभेच्या १७ जागा असून, विधानसभेच्या ११९ जागा आहेत. यावेळी लोकसभेसाठी २.८ कोटी मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यात १ कोटी ४१ लाख ५६ हजार १८२ मतदार हे पुरुष आहेत, तर १ कोटी ३९ लाख ५ हजार ८११ मतदार या महिला आहेत.

२०१४ लोकसभा निवडणुकीतील पक्षीय बलाबल

२०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत तेलंगणा हा आंध्र प्रदेशचाच भाग होता. लोकसभा निवडणुकीनंतर महिन्याभराने आंध्र प्रदेशाचे विभाजन झाले. मात्र, त्या निवडणुकीत राव यांच्या टीआरएस पक्षाने ११ जागा जिंकल्या होत्या.

First Published on: March 30, 2019 4:04 AM
Exit mobile version