इगतपुरी विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १२७

इगतपुरी विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १२७

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी हा विधानसभा मतदारसंघ नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. नाशिक मुंबई महामार्गाच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या इगतपुरी मतदारसंघामध्ये आदिवासी जास्त संख्येने आहे. हा मतदारसंघ आदिवासीसाठी राखीव असून या मतदारसंघात त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, टाकेद, घोटी, वाडीवर्हे, गोंदे हे महत्वाचे भाग येतात. पैकी वाडीवर्हे आणि गोंदे या ठिकाणी औद्योगिक वस्ती आहे. येथे निर्णायक मतदान आदिवासी वर्गाचे आहे. कष्टकरी कामकरी आदिवासी वर्ग येथे प्रामुख्याने बघावयास मिळतो.

मतदारसंघ क्रमांक : १२७

मतदारसंघ आरक्षण :अनुसूचीत जमाती

मतदारांची संख्या

पुरुष : १,३३,६७०
महिला : १,२५,५५५
तृतीयपंथी : ०
एकूण मतदान २,५९,२२५

विद्यमान आमदार : निर्मला गावित, कॉंग्रेस

माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांच्या कन्या असलेल्या निर्मला गावित यांनी नाशिक महापालिकेत नगरसेविका म्हणून आपली राजकीय सुरुवात केली होती. २००९ मध्ये सर्वप्रथम विधानसभा निवडणूक लढवत विधानभवनात प्रवेश केला. पुढच्या म्हणजेच २०१४ च्या निवडणुकीत सगळीकडे भाजपची हवा असली तरी त्यांनी इगतपुरी मतदारसंघात आपला कॉंग्रेसचा झेंडा खाली उतरवू दिला नाही.

सलग दोन टर्म आमदार असलेल्या गावित यांनी मात्र यावेळी शिवसेनेचा भगवा हाती घेत कॉंग्रेसला सोडचिटठी दिली आहे. सोबतच, आपल्या आमदारकीचा राजीनामा देखील त्यांनी नुकताच विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे. मात्र, वडिलांनी ९ टर्म कॉंग्रेसच्या तिकीटावर नंदुरबार मधुन उमेदवारी करत सलग विजय मिळविला होता आणि आता निर्मला गावित यांनी २ टर्म कॉंग्रेस कडून उमेदवारी करून विधानभवनात प्रवेश केला होता. त्यामुळे आता सेनेच्या तिकीटावर त्यांना जनता स्वीकारते का हे ही बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

इगतपुरी विधानसभा मतदारसंघ आमदार निर्मला गावित

२०१४ विधानसभा निवडणुकीची परिस्थिती

निर्मला गावित – कॉंग्रेस – ४९,१२८
शिवराम झोले – शिवसेना – ३८,७५१
हिरामन खोसकर – राष्ट्रवादी – २१,७४६
काशीनाथ मेंगाळ – अपक्ष – १७, १६७
चंद्रकांत खाडे – भाजप – ११,२५०


हे देखील वाचा – नाशिक लोकसभा मतदारसंघ


First Published on: September 14, 2019 6:12 PM
Exit mobile version