मुंबईचा ऐतिहासिक वारसा धोक्यात, सीएसएमटीच्या मुख्य घुमटालाच गळती!

मुंबईचा ऐतिहासिक वारसा धोक्यात, सीएसएमटीच्या मुख्य घुमटालाच गळती!

सीएसएमटी स्थानक

जागतिक वारसा असलेली मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात सीएसएमटीच्या मुख्य इमारतीला गळती लागल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. विशेष म्हणजे इमारतीच्या मुख्य मोठ्या घुमटालाच गळती लागली असून पावसाचं पाणी आतमध्ये झिरपायला सुरूवात झाली आहे. हे पाणी बांधकामात आतपर्यंत झिरपून या ऐतिहासिक इमारतीचं नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडून इमारतीच्या मुख्य घुमटाची पाहणी केली गेली. मात्र, त्यांना गळतीची नेमकी जागा सापडलीच नाही. अखेर आता या पाहणीसाठी ड्रोनची मदत घेतली जाणार असल्याचं मध्य रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान, राज्यातल्या इतर ठिकाणांप्रमाणेच मुंबईत देखील नोव्हेंबर सुरू होऊनही अवकाळी पाऊस थांबायचं नाव घेत नाहीये. त्यामुळे मुंबईकरांचे मात्र हाल होत आहेत.

दुरुस्तीआधी चित्रीकरण करणार

हेरिटेज वास्तू म्हणून सीएसएमटीच्या इमारतीला मान्यता मिळालेली आहे. त्यामुळे जागतिक वारशांच्या यादीत तिचा समावेश झालेला आहे. अशा वास्तूंचं जतन करणं ही प्रशासनाची महत्त्वाची जबाबदारी असते. मात्र, सीएसएमटीच्या मुख्य घुमटालाच गळती लागल्यामुळे तिची तातडीने दुरुस्ती करणं आवश्यक झालं आहे. या पूर्णपणे दगडी बांधकामाला गळती लागल्यामुळे त्यातून पाणी आतपर्यंत झिरपण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आता गळतीची ठिकाणं शोधण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. याद्वारे काढण्यात आलेल्या फोटो आणि व्हिडिओंच्या माध्यमातून गळतीच्या जागांचं निरीक्षण करून तिथे दुरुस्तीचं काम केलं जाणार आहे. पावसाळा संपल्यानंतर तज्ज्ञांच्या देखरेखीखाली इमारतीच्या डागडुजीचं काम केलं जातं. मात्र, यंदा पावसाळाच लांबल्यामुळे हे काम देखील लांबलं आहे. सीएसएमटीच्या इमारतीला एकूण ४ घुमट आहेत. त्यातला मधला सर्वात मोठा मुख्य घुमट आहे.


हेही वाचा – सीएसएमटी स्थानक ‘पर्यावरणस्नेही’ म्हणून ओळखले जाणार!

सीएसएमटी इमारतीचा इतिहास…

पूर्वी या इमारतीला व्हिक्टोरिया टर्मिनस स्टेशन म्हणूनही ओळखलं जात होतं. राणी व्हिक्टोरियाच्या नावावरून या वास्तूचं नाव पडलं होतं. १८७८मध्ये या इमारतीचं बांधकाम सुरू झाल. तब्बल १० वर्षांनी म्हणजेच १८८८मध्ये ती बांधून पूर्ण झाली. ब्रिटिश आर्किटेक्ट एफ. डब्ल्यू. स्टीव्हन्स याने संपूर्ण इमारतीचं डिझाईन तयार केलं होतं. मुंबईतल्या अनेक ब्रिटिशकालीन गॉथिक पद्धतीच्या इमारतींपैकी ही एक महत्त्वाची इमारत आहे.

First Published on: November 2, 2019 12:02 PM
Exit mobile version