मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघ – म.क्र.११४

मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघ – म.क्र.११४

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मध्य हा विधानसभा मतदारसंघ धुळे लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. विकासाच्या ऐवजी धर्मकारणामुळे तसेच मुस्लिम समाजातील दखनी – मोमीन वादामुळे मालेगावची निवडणूक ही नेहमीच राज्यभर चर्चेचा विषय होत आलेली आहे. आसिफ शेख हे विद्यमान आमदार आहेत. जनता दलाचे सर्वेसर्वा निहाल अहमद यांचा बालेकिल्ला, मात्र १९९९ मध्ये विद्यमान महापौर रशीद शेख यांनी त्यांचा पराभव करत ‘जायंट किलर’ उपाधी मिळवली. जनता दलाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणाऱ्या या मतदारसंघात निहाल अहमद यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र नगरसेवक बुलंद इकबाल यांनी सातत्याने संपर्क ठेवत धुगधुगी कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र दुर्दैवाने त्यांचेच आठवड्याभरापूर्वी निधन झाले. पक्षाचे सचिव व बुलंद यांचे मेहुणे मुस्तकिम डिग्निटी यांनी जनता दलाचा या निवडणुकीत उमेदवार नसेल, असे स्पष्ट करत एम आय एमच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. हे पाठबळ मुफ्ती यांना आयते मिळाले आहे.

मतदारसंघ क्रमांक – ११४

आरक्षण – खुला

मतदार संख्या
पुरुष १,९१,६३०
महिला १,५२,२५८
तृतीयपंथी
एकुण २,९१,६३०

विद्यमान आमदार- आसिफ शेख रशीद

नगरसेवक ते नगराध्यक्ष, आमदार ते आता महापौर असा राजकीय प्रवास करणारे रशीद शेख यांचा दांडगा जनसंपर्क, मुस्लीम तसेच हिंदू समाजात जिव्हाळ्याचे व सलोख्याचे संबंध आहेत. १९९९ नंतर सलग दुसऱ्यांदा २००४ मध्ये विजयी झाल्यानंतर राज्यमंत्री दर्जाचे यंत्रमाग महामंडळाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली. याच दरम्यान आसिफ यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. २००२ मध्ये त्यांनी महापालिकेत प्रवेश केला. जनता दलाचे बहुमत असतांनाही निहाल अहमद यांच्या राजकारणावर मात करत २००५ मध्ये अडीच वर्षे महापौरपद यशस्वीरित्या सांभाळले. शेख कुटूंबातील शेख रशीद आसिफ यांचे शिवाय रशीद यांची पत्नी ताहेरा आणि भाऊ खलील महापालिकेच्या राजकारणात सक्रिय आहेत.

२००९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत रशीद यांना धर्मगुरू मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यावेळी मौलाना यांनी विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षाकडून निवडणूक लढविली होती. निवडून येताच त्यांनी काॅंग्रेसशी सलोखा साधला. २०१४ मध्ये राष्ट्रवादीकडून उमेदवारी करणा-या मौलाना यांचा जोरकस पराभव करत आसिफ यांनी पित्याच्या पराभवाची परतफेड केली. या पाच वर्षांच्या काळात विद्यमान आमदार आसिफ शेख हे विकासकामे आणि मतदारांशी सतत संपर्कामुळे नेहमी चर्चेत राहिले आहेत. मात्र २० नगरसेवकांसह नुकतेच एम आय एममध्ये प्रवेशकर्ते झालेले माजी आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांचे कडवे आव्हान असेल.

मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघ आमदार शेख आसिफ रशीद

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल-

शेख आसिफ – काॅंग्रेस – ७५,३२६
मुफ्ती मोहम्मद इस्माईल खलीक – राष्ट्रवादी – ५९,१७५


हे देखील वाचा –  धुळे लोकसभा मतदारसंघ


First Published on: September 24, 2019 6:43 PM
Exit mobile version