४२ – सोलापूर लोकसभा मतदारसंघ

४२ – सोलापूर लोकसभा मतदारसंघ

सोलापूर लोकसभा मतदारसंघ

पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून सोलापूर लोकसभेकडे पाहिले जाते. २०१४ साली मोदी लाटेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना भाजपचे नवखे उमेदवार अॅड. शरद बनसोडे यांच्याकडून मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. सोलापूर हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून समजला जात होता. मात्र २००४ साली भाजपच्या सुभाष देशमुख यांनी तर २०१४ साली शरद बनसोडे यांच्या रुपात भाजपने येथे आपला झेंडा रोवला. २०१९ ला हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडे आणण्यासाठी सुशीलकुमार शिंदे यांनी तयारी सुरु केली आहे.

देशाच्या स्वातंत्र लढ्यापासून सोलापूर जिल्ह्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सोलापूरमधील सहा विधानसभा मतदारसंघापैकी तीन मतदारसंघ हे काँग्रेसकडे असून एक मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे. सोलापूर उत्तर आणि दक्षिण हे दोन मतदारसंघ भाजपकडे आहेत. त्यामुळे काँग्रेसची लोकसभा मतदारसंघावर तशी चांगली पकड आहे. २०१४ मोदी लाट ओसरलेली आहे. विद्यमान खासदारांच्या विरोधात जनतेमध्ये नाराजीचा सूर आहे. याचा फायदा सुशीलकुमार शिंदे यांना होईल. मात्र दोन्ही पक्ष आपल्या प्रचाराची रणनिती कशाप्रकारे बनवतात, यावरच विजयाचे गणित अवलंबून आहे.

सोलापूर मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याकारणाने वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रकाश आंबेडकर देखील इथून निवडणूक लढण्यास इच्छूक असल्याचे बोलले जात होते. तसे झाल्यास सोलापूर मतदारसंघात निवडणुकीची चुरस वाढण्याची शक्यता आहे.


मतदारसंघ क्रमांक – ४२

नाव – सोलापूर

संबंधित जिल्हा – सोलापूर

प्रमुख उद्योग-व्यवसाय – शेती

मतदारसंघ आरक्षण – अनुसूचित जाती (SC)

मतदारांची संख्या (२०१४) – १७ लाख २ हजार ७३९

पुरुष – ८ लाख ९३ हजार ७३४

महिला – ८ लाख ८ हजार ९९०


लोकसभा निवडणूक – २०१९ चे निकाल 

डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी – भाजप – ५ लाख २४ हजार ९८५

सुशीलकुमार संभाजीराव शिंदे – काँग्रेस – ३ लाख ६६ हजार ३७७

प्रकाश यशवंत आंबेडकर – वंचित बहुजन आघाडी – १ लाख ७० हजार ००७

नोटा – ६ हजार १९१

प्रो,डॉ. अर्जुन गेना ओहळ – बहुजन मुक्ती पार्टी -३ हजार ८८०


सोलापूर मधील विधानसभा मतदारसंघ

२४७ मोहोळ (SC) – रमेश कदम, राष्ट्रवादी

२४८ सोलापूर शहर उत्तर – विजय देशमुख, भाजप

२४९ सोलापूर शहर मध्य – प्रणिती शिंदे, काँग्रेस

२५० अक्कलकोट – सिद्धराम म्हेत्रे, काँग्रेस

२५१ सोलापूर दक्षिण – सुभाष देशमुख, भाजप

२५२ पंढरपूर – भारत भालके, काँग्रेस


विद्यमान खासदार शरद बनसोडे

विद्यमान खासदार – शरद बनसोडे, भाजप

अॅड. शरद बनसोडे हे २००९ साली देखील सुशीलकुमार यांच्याविरोधात निवडणुकीला उभे राहिले होते. तेव्हा त्यांना २ लाख ८७ हजार मते मिळाली होती. मात्र २०१४ साली मोदी लाट असल्यामुळे त्यांना तब्बल ५ लाख मते मिळाली आणि मोठ्या मताधिक्याने ते निवडून आले. २०१४ साली निवडणुकीसाठी इच्छूक नसतानाही बनसोडे यांनी निवडणूक लढवली होती. यावेळी मात्र ते उमेदवारीसाठी इच्छूक आहेत. तरिही मतदारांची नाराजी लक्षात घेता सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी राज्यसभेतील खासदार अमर साबळे यांना उमेदवारी मिळावी, यासाठी आग्रही आहेत. सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री विजय देशमुख आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या वादाचा फटका बनसोडे यांना बसण्याची शक्यता आहे.


 

२०१४ मधील मतांची आकडेवारी

शरद बनसोडे, भाजप – ५ लाख १७ हजार ८७९

सुशीलकुमार शिंदे, काँग्रेस – ३ लाख ६८ हजार २०५

अॅड. संजीव सदाफुले, बसपा – १९ हजार ४१

नोटा – १३ हजार ७७८

First Published on: March 3, 2019 4:32 PM
Exit mobile version