द्राक्ष व्यापाऱ्याला मारहाण करून 1 कोटी 10 लाख लुटले; वाचा, कुठे घडली ही घटना

द्राक्ष व्यापाऱ्याला मारहाण करून 1 कोटी 10 लाख लुटले; वाचा, कुठे घडली ही घटना

सांगली : जिल्ह्यातील तासगावमध्ये सहा ते सात जणांनी द्राक्ष व्यापाऱ्याला लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांच्या गाडीमधील 1 कोटी 10 लाख रोख रक्कम असलेली बॅग हल्लेखोरांनी लुटले आहेत.

सांगलीच्या तासगावमधील द्राक्ष व्यापारी महेश शितलदास केवलानी मूळचे नाशिकचे असून सध्या ते तासगावमधील गणेश कॉलनीत राहत आहेत. ही घटना दत्तमाळ गणेश कॉलनीतील घडली असून पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी केली आहे.

तासगाव-सांगली रोडवरील गणेश कॉलनी इथे अंधाराचा फायदा घेत महेश शितलदास यांची गाडी अडवून त्यांना व इतर दोघांना मारहाण करुन आरोपींनी १ कोटी १० लाख रुपये लुटले आहेत. गणेश कॉलनीतील एका रो हाऊसमध्ये द्राक्ष व्यापारी भाड्याने राहत असून ते तासगाव शहरासह तालुक्यातील द्राक्ष गेल्या चार ते पाच वर्षापासून खरेदी करून बांग्लादेशला पाठवण्याचे काम करतात. यावर्षीसुद्धा त्यांनी द्राक्ष खरेदी करुन बांग्लादेशला पाठवले आणि त्यांचे पैसे घेण्यासाठी ते ड्राईव्हर आणि दिवाणजीसोबत सांगली येथे गेले होते. पैसे घेऊन ते घराकडे येत असताना संध्याकाळी सातच्या दरम्यान गणेश कॉलनीतील मधल्या रोडवर अंधाराचा फायदा घेत त्यांची गाडी काही अज्ञातांनी अडवली. यावेळी एकाने ड्राईव्हरला कोणत्यातरी गोष्टीचा धाक दाखवून रोखले तर इतरांनी मागे बसलेल्या संबंधित महेश आणि दिवाणजींवर हल्ला करून त्यांना गाडीबाहेर काढले. यावेळी त्यांनी महेश यांच्या जवळील पैशांची बॅग खेचून घेतली. अज्ञातांपैकी अर्धे लोक एका बाजूला तर अर्धे लोक दुसऱ्या बाजूला निघून गेल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.

आठ ते दहा आरोपी असल्याचा पोलिसांना अंदाज
या घटनेनंतर द्राक्ष व्यापाऱ्याने कॉलनीतील काही लोकांना सोबत घेऊन पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांना घडलेला सर्व प्रकार सांगितल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला. आठ ते दहा जणांनी द्राक्ष व्यापाऱ्याला लुटल्याचा पोलिसांना अंदाज आहे. व्यापाऱ्याजवळील एक कोटी दहा लाख रुपयांची एवढी मोठी रक्कम लुटल्यामुळे तासगाव शहरात खळबळ उडाली आहे.

 

First Published on: March 29, 2023 9:07 AM
Exit mobile version