रायगडला १०० कोटींची मदत

रायगडला १०० कोटींची मदत

करोनाच्या संकटात आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणातील रायगड जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसला असून, शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शंभर कोटी रुपये देण्याची घोषणा केली. शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्र्यांनी रायगड जिल्ह्याचा पहाणी दौरा केला त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. निसर्ग चक्रीवादळाला रायगडकरांनी खंबीरपणे तोंड दिले, मात्र चक्रीवादळामुळे जिल्ह्याचे अपरिमित नुकसान झाले आहे. असे असले तरीही आपल्याला पुन्हा उभे राहावेच लागेल, यासाठी रायगड जिल्ह्याला तातडीची मदत म्हणून सरकारकडून शंभर कोटी रुपये देण्याची घोषणा केल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणालेत. रायगड दौर्‍यावरून परताच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांच्यात सुमारे दीड तास चर्चा झाल्याचे समजते.

पंचनामे पूर्ण होण्यासाठी आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागू शकतो. मात्र नुकसान झालेल्या लोकांनी झालेल्या नुकसानीचे फोटो काढून ठेवावेत. व्हिडिओ काढून ठेवावेत. पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे आधी आपले घर आवरुन घ्यावे. नुकसानीचे काढलेले फोटो व व्हिडिओ पंचनामाच्या कार्यवाहीत ग्राह्य धरण्यात येतील असे देखील मुख्यमंत्री यावेळी म्हणालेत. सर्वात आधी घर व परिसराची साफसफाई करून घ्यावी लागणार आहे. जेणेकरून पावसाच्या या दिवसात अस्वच्छतेमुळे परिसरात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही असे देखील ते म्हणालेत.

उद्धव ठाकरे-शरद पवारांमध्ये वर्षावर बैठक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रायगडच्या दौर्‍यावरुन परतल्यानंतर त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत वर्षा बंगल्यावर बैठक झाली. या बैठकीत निसर्ग चक्रीवादळामुळे झालेले नुकसान आणि राज्य सरकारकडून होणार्‍या मदतीबाबत ठाकरे-पवार यांच्यात सविस्तर चर्चा झाल्याचे समजते. मात्र बैठकीतील सविस्तर माहिती काही समजू शकलेली नाही. गेल्या काही दिवसांमध्ये ठाकरे व पवारांमध्ये झालेली ही तिसरी महत्त्वाची बैठक आहे.

सरकार जनतेच्या पाठीशी खंबीर
सर्वात जास्त नुकसान विजेच्या खांबांचे झाले आहे. घरांची पडझड झाली आहे. झाडांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या सर्व गोष्टी पुन्हा सुरळीत होण्यासाठी अधिक तांत्रिक मनुष्यबळाची गरज लागणार आहे. यासाठी सरकार स्तरावरून मदत निश्चित केली जाईल. याबरोबरच ज्या नागरिकांचा या वादळामुळे अन्नधान्याचा आणि जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे, शासन त्यांच्या अन्नधान्याचा, जेवणाचा प्रश्न निश्चितच सोडविणार. जनतेच्या पाठीशी हे शासन खंबीरपणे उभे असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणालेत. दरम्यान, यावेळी अलिबाग तालुक्यातील उमटे गावातील दशरथ बाबू वाघमारे, वय वर्षे 58 ही व्यक्ती चक्रीवादळामुळे विजेचा खांब अंगावर पडून मृत्युमुखी पडली होती. त्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई म्हणून चार लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते देण्यात आला.

First Published on: June 6, 2020 7:10 AM
Exit mobile version