मराठवाड्यातील ११ धरणे एकमेकांशी जोडणार

मराठवाड्यातील ११ धरणे एकमेकांशी जोडणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुढच्या पिढीला मराठवाड्यात दुष्काळ पाहू देणार नाही. त्यासाठी जे करावे लागेल ते करू. या पिढीने मराठवाड्यात बाराही महिने दुष्काळच पाहिला आहे, पण मराठवाड्यातील दुष्काळ हा भूतकाळ असेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. वॉटर ग्रीड योजनेच्या माध्यमातून मराठवाड्यातील ११ धरणे एकमेकांना जोडून दुष्काळ दूर करण्यात येईल. औरंगाबाद येथे गंगापूरच्या फाईव्ह स्टार चारा छावणीची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते.

वॉटर ग्रीड योजनेअंतर्गत प्रमुख ११ धरणे एकमेकांशी जोडण्यात येणार आहेत. या प्रकल्पासाठी इस्राईलसोबत करार करण्यात आलेला आहे. या योजनेच्या निविदा प्रक्रियेचे काम हे येत्या दोन महिन्यात सुरू होणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. योजनेअंतर्गत पाईपच्या माध्यमातूनच पिण्याचे आणि सिंचनाचे पाणी पोहोचवायचे आहे. समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरीच्या खोर्‍यात आणता येईल, तसे झाले तर १०० टीएमसी पाणी मराठवाड्यात आणू शकतो, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी जलयुक्त शिवारच्या कामाचे कौतुक केले. राज्यात जलयुक्त शिवारची कामे झाली नसती तर आत्तापेक्षा भीषण दुष्काळाचा सामना करावा लागला असता. जलयुक्त शिवारमुळे विहिरींना पाणी राहिले. त्यामुळे ग्रामीण भागात टँकरशिवाय बराच काळ पाणी वापरता आले. त्याचाच परिणाम म्हणून शेतीची उत्पादकताही वाढली. आता मराठवाड्याची दुष्काळापासून कायम सुटका करायची आहे. केंद्र सरकारने दुष्काळ निवारणासाठी राज्याला ४ हजार कोटींची मदत केली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

First Published on: June 9, 2019 5:46 AM
Exit mobile version