तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार पीडिता दीड महीन्यांची गर्भावती

तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार पीडिता दीड महीन्यांची गर्भावती

मागील दोन महिन्यांपासून वारंवार बलात्कार होऊन तेरा वर्षीय अल्पवयीन मुलगी दीड महिन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक घटना वैद्यकीय तपासणीत समोर आल्याने जामखेड तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. जामखेड तालुक्यातील आनंदवाडी गावात घडलेल्या घटनेप्रकरणी दोघा जणांविरोधात बलात्कारासह पॉस्को अंतर्गत जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी मुख्य आरोपीला ताब्यात घेण्याची धडक कारवाई केली आहे.

पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जामखेड तालुक्यातील आनंदवाडी येथील एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन महिन्यांपुर्वी आरोपीने त्याच्या राहत्या घरात अत्याचार केला होता. त्याबरोबर मागील महिन्यात पीडिता आपल्या आजी आजोबांकडे शेतात जात आसताना मोटारसायकलवरून आलेल्या आरोपीने आपल्या भावाच्या मदतीने पीडितेला एका शेतात घेऊन जात तिच्यावर पुन्हा अत्याचार केला होता. दोन महिन्यांपासुन पीडितेवर वारंवार अत्याचार करणाऱ्या नराधमाने घडलेला प्रकार कुणाला सांगितला तर तुझ्या भावांना मारुन टाकीन अशी धमकी पीडितेला दिली होती. त्यामुळे भीतीपोटी पीडिताने सलग दोन महीने अत्याचार होऊनही घडलेला प्रकार घरात कुणालाही सांगितला नव्हता.

दरम्यान ११ मार्च रोजी पीडितेला त्रास होऊ लागल्याने ती घरात रडत बसली होती. आपली मुलगी का रडत आहे हे पाहण्यास गेलेल्या पीडितेच्या आईने पीडितेकडे का रडतेस अशी विचारणा केली असता तिने घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला. त्यानंतर पीडितेस घरच्यांनी जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी केलेल्या तपासणीनूसार पीडिता दीड महिन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक बाब समोर आली होती.

दरम्यान पीडितेने जामखेड पोलिस स्टेशनला दाखल केलेल्या फिर्यादीनुसार विजय उर्फ दादा पोपट घुगे (वय २१ , रा आनंदवाडी ता जामखेड ) या मुख्य आरोपीसह त्याला मदत करणाऱ्या त्याच्या अल्पवयीन भावाविरोधात बलात्कारासह पॉस्को अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपीच्या जामखेड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. सहाय्यक पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, पो कॉ. मनोज साखरे, यांच्या टीमने आरोपीला ताब्यात घेण्याची धडक कारवाई केली आहे. पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण हे पुढील तपास करत आहेत.

First Published on: March 13, 2020 10:28 PM
Exit mobile version