गणरायाकडून १३ हजार रक्त पिशव्यांचे दान; लालबागचा राजा आणि सिद्धीविनायक न्यासाचा पुढाकार

गणरायाकडून १३ हजार रक्त पिशव्यांचे दान; लालबागचा राजा आणि सिद्धीविनायक न्यासाचा पुढाकार

लॉकडाऊनमध्ये राज्यातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेता मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांनी राजकीय, सामाजिक, धार्मिक, संघटनांना रक्तदानासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले होते. त्याला सिद्धीविनायक न्यास आणि लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळांने प्रतिसाद देत तब्बल १३ हजार ८६६ पिशव्या रक्त संकलन केले. त्यामुळे थॅलेसेमिया आणि रक्ताचे इतर आजारासाठी नियमित रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना गणरायाच पावला आहे.

कोरोनाकाळात लालबागचा राजा आणि सिद्धीविनायक न्यायासाठी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या संस्थांनी घेतलेल्या पुढाकारामुळे मुंबईमध्ये रक्ताचा तुटवडा भासला नाही. लालबागचा राजा मंडळाने मार्चमध्ये १७५० रक्त पिशव्या संकलन केले. तर सिद्धीविनायक न्यासाकडून एप्रिल ते जुलैदरम्यान गृहनिर्माण संस्था, शिवसेना शाखेमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करून १८४४ रक्त पिशव्यांचे संकलन केले. लालबागचा राजा मंडळाने आरोग्य उत्सवात २२ ते ३१ ऑगस्ट दरम्यान पुन्हा १० हजार २७२ रक्त पिशव्यांचे विक्रमी रक्त संकलन केले. असे दोन्ही मंडळांचे मिळून १३ हजार ८६६ पिशव्या रक्त संकलन करण्यात आले. या रक्तसंकलनामुळे तुटवड्याच्या काळात रक्तपेढ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे राज्य रक्त संक्रमण परिषदेमार्फत या दोन्ही संस्थांचे अभिनंदन करून धन्यवाद मानण्यात आल्याची माहिती राज्य रक्त संक्रमण परिषदेचे सहाय्यक संचालक डॉ. अरुण थोरात यांनी दिली.

First Published on: September 6, 2020 6:31 PM
Exit mobile version