उस्मानाबादमधील उरुसमध्ये चेंगराचेंगरी, गर्दीत अचानक वळू घुसला आणि….

उस्मानाबादमधील उरुसमध्ये चेंगराचेंगरी, गर्दीत अचानक वळू घुसला आणि….

हिंदू मुस्लिम ऐक्याच प्रतिक असलेल्या या उरुसाला सुरूवात झाली असून उस्मानाबादमध्ये उरुसाठी राज्यातील लाखो भाविकांनी हजेरी लावली होती.

हिंदू मुस्लिम ऐक्याच प्रतिक असलेल्या या उरुसाला सुरूवात झाली असून उस्मानाबादमध्ये उरुसाठी राज्यातील लाखो भाविकांनी हजेरी लावली होती. अनेक वर्षाची परंपरा असलेल्या या उरुसामध्ये विविध ठिकाणाहून भाविक मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात. उरूसाच्या या उत्साहावर विरजण घालणारी एक बातमी समोर येतेय. उस्मानाबादमधील उरुसमध्ये चेंगराचेंगरी झाल्याची माहिती मिळतेय. यात १४ भाविक जखमी झाले आहेत.

अजमेरनंतर दक्षिण भारतातील सर्वात मोठा दर्गा म्हणून उस्मानाबाद येथील हजरत ख्वाजा शमसोद्दीन गाजी दर्गा ओळखला जातो. राज्यातील प्रमुख उरुसपैकी एक असलेल्या या हजरत ख्वाजा शमसोद्दीन गाजी यांच्या उरुसला जवळपास १५ हजार भाविक घटनास्थळी आले होते. या उरुसचे आणि देवस्थानचे वैशिष्ट्य म्हणजे, या उरुससाठी हिंदू आणि मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. हजरत ख्वाजा यांचे भक्त जगभरात असून उरुसमध्ये हिंदू धर्मासह मुस्लिम समाजाला विविध धार्मिक विधीचे मानपान आहे.

पहाटे तीन वाजता या धार्मिक विधी सुरू असताना लोकांनी भरलेल्या गर्दीत अचानक एक मोकाट वळू घुसला आणि लोकांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली. गर्दीत वळू उधळल्याचं पाहून लोक घाबरून सैरावैरा पळू लागले. लोकांचा हा गोंधळ चेंगराचेंगरीत रुपांतरीत झाला. या चेंगराचेंगरीत जवळपास १४ भाविक गंभीर जखमी झाले असून जखमी भाविकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी ताबडतोब घटनास्थळी हजेरी लावली. पोलिसांसोबत वैद्यकीय पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण मिळवल्यानं मोठा अनर्थ टळला आहे. जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

First Published on: February 9, 2023 9:47 AM
Exit mobile version