नाशिकमध्ये १६७ प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी कोरोनाबाधित

नाशिकमध्ये १६७ प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी कोरोनाबाधित

शहरात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. कोरोनामुळे तीन महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याच्या घटना ताजी असताना नाशिकमधील महाराष्ट्र पोलीस अकॅडमीतील तब्बल 167 प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, आरोग्य विभाग हादरून गेला आहे.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून खबरदारी घेतली जात आहे. गत आठवड्यात महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून महाराष्ट्र पोलीस अकॅडमीतील ८९४ संशयितांचे स्बॅव तपासणी पाठवण्यात आले होते. त्यामध्ये तीन दिवसांत १६७ प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांना शहरातील ठक्कर डोम कोव्हिड सेंटर, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय आणि खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अकॅडमीच्या प्रवेशद्वारावरच निर्जंतूक करुन प्रवेश दिला जात आहे. अधिकार्‍यांचे तापमान व ऑक्सिजन पातळी तपासून प्रवेश दिला जात आहे. अकॅडमीमध्ये ७०० प्रशिक्षणार्थी असून आणखी ७०० पोलीस अधिकारी व कर्मचारी आहेत. खबरदारी म्हणून आता पोलीस उपनिरीक्षक व चतुर्थश्रेणीतील कर्मचार्‍यांना अकॅडमीच्या आवारातून बाहेर जाण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.

महाराष्ट्र पोलीस अकॅडमीतील ८९४ नमुने तपासण्यात आले असून, १६७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. खबरदारी म्हणून त्यांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेतला जात आहे. १२१ पॉझिटिव्ह रुग्ण ठक्कर डोम येथील कोव्हिड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. उर्वरित वैद्यकीय महाविद्यालय व खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
– बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधिकारी, नाशिक महापालिका

First Published on: December 24, 2020 11:57 PM
Exit mobile version