दोन हजारांची नोट चलनात, तरीही नागरिकांची फरफट

दोन हजारांची नोट चलनात, तरीही नागरिकांची फरफट

दिलीप कोठावदे । नवीन नाशिक

दोन दिवसांपूर्वी भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याबाबत घोषणा केली. तेव्हापासून मध्यमवर्गीयांकडून २००० रुपयांच्या नोटा वापरण्यासाठी वेगवेगळे पर्याय अवलंबिले जात आहेत. दुसरीकडे दुकानदार, सराफ व्यावसायिक, पेट्रोल पंप चालकांकडूनही दोन हजारांच्या नोटा स्विकारण्याच्या बदल्यात अटी घातल्या जात असून, काहींनी तर तसे फलकही लावले आहेत. त्यामुळे दोन हजारांची नोट चलनात असूनही, नागरिकांची फरफट सुरू आहे.

अनेक महिन्यांपासून दुर्लभ झालेल्या दोन हजारांच्या नोटा बंदीची घोषणा होताच मोठ्या संख्येने बाजारात दाखल झाल्या आहेत. त्यामुळे व्यवसायिकांनाही सुट्या पैशांची अडचण निर्माण होत असल्याने बाजारात ग्राहकांची दोन हजारांच्या नोटा कटविण्यासाठी तर, व्यावसायिकांची सुटे पैसे मिळविण्यासाठी धावपळ सुरू आहे.

रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटा ग्राहकांना त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा तसेच, त्या बदलून घेण्याचा पर्याय दिलेला आहे. तरीही सर्वसामान्य नागरिकांकडून खरेदीसाठी या नोटांचा पर्याय सुलभ वाटत असल्याने बहुतांश नागरिकांकडून सराफी पेढ्या, पेट्रोलपंपाबरोबरच किराणा, मेडिकलसह इतर व्यवसायिकांकडे नोटा खपविण्याचा मार्ग अवलंबिला आहे. एवढीच नव्हे तर लवकरच शाळा-महाविद्यालये सुरू होणार असल्याने अनेक पालकांकडून वह्या-पुस्तके व स्टेशनरी खरेदीसाठीही दोन हजारांच्या नोटा कटविण्याची शक्कल लढवली आहे.

या सर्व प्रकारात रोख व्यवहारांमध्ये अचानक वाढ झाल्यामुळे दुकानदार-व्यावसायिकांची मात्र कोंडी झाली आहे. दोन हजारांच्या नोटांची संख्या वाढल्याने सुटे पैसे परत देण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे व्यावसायिकांना सुट्या पैशांचा शोध घ्यावा लागत आहे. या अडचणींवर मात करण्यासाठी काही व्यावसायिकांनी तर चक्क दुकानात फलक लावले आहेत. या फलकांवरील मजकूरही मजेशीर असल्याने हलक्या-फुलक्या भाषेत सूचना देण्याचा फंडा चांगलाच चर्चेत आहे. याशिवाय नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर्स वेल्फेअर असोसिएशनकडून फलक तयार करण्यात आले असून, ग्राहकांना विनंती करणारे हे फलक आता अनेक पेट्रोलपंपांवर झळकू लागले आहेत.

खरेतर नागरिकांकडून भीतीपोटी नोटा खपविण्यावर भर दिला जातो आहे. त्यामुळे सुट्या पैशांचा प्रश्न निर्माण होत असल्याने आता दोन हजार किंवा त्यापेक्षा अधिक रकमेची खरेदी करणार असाल तरच दोन हजारांची नोट द्या, अशी विनंती व्यावसायिकांकडून केली जात आहे. यापूर्वीदेखील नोटबंदी झालेली असताना किराणा, मेडिकल, सराफ, पेट्रोलपंप आदी ठिकाणी जुन्या पाचशे व एक हजाराच्या नोटा खपविण्याकडे नागरिकांचा कल बघायला मिळाला होता. यामुळे २०१६ मध्ये नोटबंदीच्या घोषणेनंतर पंपांवर इंधन भरताना जुन्या नोटा देणार्‍यांच्या रांगा लागल्याचे चित्र बघायला मिळाले होते. तसाच काहीसा प्रकार आतादेखील दिसून येत आहे.

First Published on: May 23, 2023 11:57 AM
Exit mobile version