जिल्ह्यात २२ हजार हेक्टर भातशेती पाण्यात!

जिल्ह्यात २२ हजार हेक्टर भातशेती पाण्यात!

ऑक्टोबर महिन्यात झालेल्या ‘क्यार’ आणि ‘महा’ वादळामुळे झालेल्या अतिवृष्टीत रायगड जिल्ह्यातील २२ हजार ६७७ हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले आहे. १ हजार ७०१ गावांतील ६७ हजार ५१ शेतकर्‍यांना या अतिवृष्टीचा फटका बसला आहे. शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम पूर्ण झाले आहे. शासनाला त्याबाबतचा अहवाल सादर करण्यात आला आहे. ८ हजार ८७२ हेक्टरवर कापणीनंतर पिकांचे नुकसान झाले, तर १३ हजार ८०५ हेक्टर वरील शेतातील उभ्या पिकाचे नुकसान झाले.

अलिबाग तालुक्यातील ५५, पेण १४०, मुरुड ७०, पनवेल १५०, उरण ४८, खालापूर १२५, कर्जत १८६, माणगाव १८७, तळे ६१, रोहे १६३, सुधागड १००, महाड १८३, म्हसळे ७२, श्रीवर्धन ७४, तर पोलादपूर तालुक्यातील ८७ गावांना अतिवृष्टीचा तडाखा बसला. रोहे, माणगाव, सुधागड, पोलादपूर, पेण, कर्जत आणि खालापूर तालुक्यात भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ऑगस्ट महिन्याच्या शेवटी झालेल्या पावसाने जिल्ह्यात १३ हजार ३०० हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले होते. ऑक्टोबर महिन्यात २२ हजार ६७७ हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले. म्हणजेच खरीप हंगामात एकूण ३६ हजारहून अधिक हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले. महत्त्वाची बाब म्हणजे नुकसान झालेल्या २२ हजार ६७७ हेक्टरपैकी केवळ २५९ हेक्टर क्षेत्रावरील शेतीलाच विम्याचे संरक्षण आहे.

First Published on: November 12, 2019 1:00 AM
Exit mobile version