Corona Update : मुंबईत २,८६८ प्रवासी दाखल, ५ जण कोरोना बाधित

Corona Update : मुंबईत २,८६८ प्रवासी दाखल, ५ जण कोरोना बाधित

मुंबईत विमानतळावर गेल्या काही दिवसात विदेशातून दाखल झालेल्या २ हजार ८६८ प्रवाशांचा शोध यंत्रणेकडून घेण्यात येत आहे. घेतला जात आहे. त्यापैकी ४ प्रवासी व त्यांच्या संपर्कातील आणखीन १ जण असे ५ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. या सर्वांची जीनोम सिक्वेन्सिंग व एस जीन चाचणी केली जाणार आहे, अशी माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

सध्या दक्षिण आफ्रिका व युरोपीय देशांत कोरोनाचा नवीन प्रकार असलेल्या ओमीक्रॉंन या विषाणूमुळे बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्याची गंभीर दखल घेऊन मुंबई महापालिका यंत्रणा अलर्ट झाली आहे. गेल्या १० ते ३० नोव्हेंबर या कालावधित मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर ४० देशांमधून २ हजार ८६८ प्रवासी दाखल झाले असून त्यापैकी सुमारे ५०० जणांच्या तपासण्या करण्यात आल्या. त्यामधून ५ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे आता मुंबई महापालिका यंत्रणा अधिक सतर्कता बाळगत आहे. उर्वरित प्रवाशांचा शोध घेण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महापालिकेने मुंबई विमानतळावर उतरणाऱ्या प्रवाशांची कडक तपासणी केली जात आहे. विमानतळावर उतरलेल्या प्रवाशांची माहिती गोळा केली जात आहे.

५ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह असले तरी त्यांना ओमायक्रोन विषाणूची लागण झाली आहे का याची तपासणी करण्यासाठी जीनोम सिक्वेन्सिंग चाचण्या केल्या जाणार आहेत. तसेच, नव्या विषाणूची माहिती देणारी ‘एस-जिन’ चाचणीही केली जाणार आहे. त्यासाठी नमुने पुण्याला पाठवण्यात आले आहेत. ‘एस-जिन’ चाचणीचा रिपोर्ट उद्या येण्याची शक्यता आहे. या चाचणीमुळे नव्या व्हेरिएंटची शक्यता आणि जिनोम सिक्वेसिंग चाचणी व पुढील कार्यवाही करण्यासाठी दिशा मिळणार असल्याची माहिती सुरेश काकाणी यांनी दिली.

First Published on: December 2, 2021 10:07 PM
Exit mobile version