3 वर्षीय चिमुकला खेळत असताना भटक्या कुत्र्यांनी त्याला फरफटत नेलं…

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या अनेक घटना दिवसेंदिवस वाढत असताना हे हल्ले अनेकदा जीवघेणेही ठरले आहेत. नागपुरातही अशीच घटना घडलीय. तीन वर्षाचा चिमुकला घराबाहेर खेळत असताना परिसरातील सहा भटक्या कुत्र्यांनी या चिमुकल्यावर हल्ला केला. या कुत्र्याच्या हल्ल्यात भटक्या कुत्र्यांनी तीन वर्षाच्या चिमुकल्याला दूरवर फरफटत नेलं.

नागपूरच्या वाठोडा परिसरातील अनमोल नगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होऊ लागलाय. या व्हिडीओमध्ये ओसाड रस्त्यावर सहा भटके कुत्रे एकामागोएक येताना दिसतात. हे सहाही भटके कुत्रे रस्त्यावर इकडून तिकडे येताना जाताना दिसतात. काही वेळाने सर्वच सहाही भटके एका दिशेने जातात. तिथून पुन्हा परत येताना एका एका कुत्र्याने त्याच्या तोंडात तीन वर्षाच्या चिमुकल्याला पकडत आणलेलं दिसतंय. हे आणखी दुसऱ्या भटक्या कुत्र्यांनी पाहताच ते ही या तीन वर्षाच्या मुलाला पकडण्यासाठी धावतात. सहाही भटके कुत्रे मिळून या तीन वर्षाच्या चिमुकल्याला अगदी फरफटत आणतात.

पण नशीब बलवत्तर म्हणून हा सगळा प्रकार या चिमुकल्याच्या आईला दिसला. आपल्या मुलाला हे भटके कुत्रे फरफटत नेत असल्याचं पाहून आईचा जीवही घाबरला आणि ती लेकाच्या मदतीसाठी पुढे धावली. आईने आपल्या मुलाला या भटक्या कुत्र्यांच्या तावडीतून वाचवलं. मात्र ही महिला तिथे वेळेत पोहोचली नसती तर पुढे काय झालं असतं, याचा विचारही करवत नाही. तसंच हे भटके कुत्रे चिमुकल्याला ज्या पद्धतीने फरफटत नेत होते ते पाहून अंगावर अक्षरशः काटा येतो.

या घटनेनंतर पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये चार वर्षांच्या चिमुकल्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ल्या केला होता. या हल्ल्यात लहानग्याचा दुर्देवी मृत्यू झाला होता. मुलगा खेळत असताना कुत्र्यांनी हल्ला चढवला होता.

तर लखनौमध्ये एका पिटबुल कुत्र्याने वृद्ध महिलेवर हल्ला केला. यामध्ये त्या महिलेचा मृत्यू झाला होता. गाझियाबादमधूनही अशीच एक घटना समोर आली आहे, जिथे पिटबुल कुत्र्याने एका लहान मुलावर हल्ला केला होता.

सुदैवाने ही बाब या ३ वर्षीय बाळाच्या आईच्या लक्षात येताच मुलाच्या आईने धाव घेतल्याने मोठी हानी टळली आहे. डुग्गु दुबे असं जखमी चिमुकल्याचं नाव आहे. कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून या घटनेचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे.

First Published on: April 13, 2023 1:55 PM
Exit mobile version