एसटीचे ३२२ कर्मचारी करोनामुक्त पुन्हा कर्तव्यासाठी सज्ज..!

एसटीचे ३२२ कर्मचारी करोनामुक्त पुन्हा कर्तव्यासाठी सज्ज..!

एसटी बस

सुमारे एक लाख चार हजार कर्मचारी असलेल्या एसटी महामंडळामध्ये ४०७ कर्मचारी कोविड पॉझिटिव्ह होते, त्यापैकी ३२२ कर्मचारी करोना मुक्त होऊन, पुनश्च: आपल्या कर्तव्यावर रुजू होण्यासाठी सज्ज झाले आहेत. तर ७२ कर्मचारी रूग्णालयात उपचार घेत असून १३ कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे.

मुंबई विभाग १००% करोनामुक्त  

२३ मार्च पासून  मुंबई महानगर प्रदेशात राहणाऱ्या डॉक्टर ,परिचारिका, पोलीस, अग्निशामक दलाचे जवान, शासकीय कर्मचारी ,महापालिका कर्मचारी, सफाई कामगार अशा हजारो अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची ने-आण  करण्याची जबाबदारी शासनाने एसटी महामंडळावर टाकली.अर्थात, गेली तीन महिने सुमारे १५००-२००० कर्मचारी दररोज ६००-८०० फेऱ्यांंद्वारे १५ हजार अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची ने-आण करीत आहेत. त्यासाठी सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे काटेकोर पालन केले जात असून, प्रत्येक बस प्रवासाला निघण्यापूर्वी योग्य रितीने निर्जंतुक केले जाते. अशी सातत्याने दळणवळण सेवा देणाऱ्या एसटीच्या मुंबई व ठाणे विभागातील सर्वाधिक कर्मचाऱ्यांना दुदैवाने करोनाची लागण झाली. आनंदाची बाब म्हणजे बरे झालेल्या रूग्णांमध्ये मुंबई विभागातील १०७ कर्मचाऱ्यांपैकी १०६ कर्मचारी करोनामुक्त होऊन घरी गेले आहेत.दुदैवाने एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.तसेच, ठाणे विभागातील  १३९  कर्मचारी रुग्णांपैकी १२७ रुग्ण कोविड मुक्त झाले आहेत.९जण रूग्णालयात उपचार घेत आहेत.तर दुदैवाने ३ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

५० लाख रुपये आर्थिक मदत

विशेष म्हणजे, एसटी महामंडळाने देखील आपल्या कर्मचाऱ्यांची योग्य ती काळजी घेतली आहे. कर्तव्यावर जाणाऱ्या प्रत्येक चालक-वाहकांना मास्क सॅनिटरी लिक्विडची बाटली तसेच एसटी महामंडळातील प्रत्येक कर्मचाऱ्याची प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने सुचवलेल्या अर्सनिक-३० या होमिऒपथिक  औषधाच्या गोळ्या देखील दिले आहेत. तसेच दुर्दैवाने जे कर्मचारी प्रत्यक्ष सेवा बजावत असताना कोविड बाधित होऊन, मृत्युमुखी पडले आहेत .त्यांच्या वारसांना ५० लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे.
First Published on: August 3, 2020 4:03 PM
Exit mobile version