हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यात ४ लाख लाभार्थी, पेपरलेस पद्धतीने रुग्णांची नोंद

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यात ४ लाख लाभार्थी, पेपरलेस पद्धतीने रुग्णांची नोंद

मुंबई महापालिकेने घराजवळ दवाखाना या उद्देशाने सुरु केलेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत १०७ दवाखान्यांच्या माध्यमातून तब्बल ४ लाख रुग्णांनी लाभ घेतल्याची नोंद करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे ३ फेब्रुवारीपर्यंत सर्व दवाखान्यातून ३ लाख रुग्णांनी लाभ घेतल्याची नोंद करण्यात आली असताना २२ फेब्रुवारीच्या रात्रीपर्यंत म्हणजे अवघ्या १९ दिवसांच्या कालावधीत आणखी एक लाख लाभार्थ्यांची यामध्ये भर पडली. त्यामुळे आपला दवाखान्यांच्या लाभार्थ्यांची संख्या तब्बल ४ लाख ५ हजार ४२६ इतकी झाली आहे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या १७ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजनेचे लोकार्पण करण्यात आले होते. महापालिका आयुक्त डॉ. इकबाल चहल आणि अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्या निर्देशानुसार व उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेचा सातत्याने विस्तार करण्यात येत असल्याचा दावा पालिका प्रशासनाने आहे.

४ लाख लाभार्थ्यांची अशी झाली नोंद

पालिकेची सदर योजना सुरु झाल्यानंतर ३० नोव्हेंबर २०२२ रोजी १ लाख लाभार्थी संख्या नोंदविण्यात आली होती. त्यानंतर १ महिना ७ दिवसांनी म्हणजे ७ जानेवारी रोजीपर्यंत लाभार्थी संख्या २ लाखांवर पोहोचली होती. तर त्यापुढे २६ दिवसांनी म्हणजे ३ फेब्रुवारी रोजीपर्यंत लाभार्थ्यांची संख्या ३ लाखांवर पोहोचली. आता त्याहीपुढे जात अवघ्या १९ दिवसांत त्यात आणखीन एक लाखांची भर पडली व १०७ दवाखान्यात मिळून एकूण ४ लाखांपेक्षाही जास्त लाभार्थ्यांची नोंद करण्यात आली आहे.

आपला दवाखान्यांमधून २२ फेब्रुवारीपर्यंत एकूण ४ लाख ०५ हजार ४२६ नागरिकांनी विविध वैद्यकीय सेवासुविधांचा लाभ घेतला आहे. यापैकी दवाखान्यांमधून ३ लाख ८९ हजार ८३३ रुग्णांनी मोफत वैद्यकीय तपासणी व मोफत औषधोपचार यांचा लाभ घेतला आहे. तर, पॉलिक्लिनिक व डायग्नोस्टिक केंद्र येथे १५ हजार ५९३ रुग्णांनी दंतचिकित्सा, स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, जनरल फिजिशियन, त्वचारोग तज्ज्ञ अशा उपचार सुविधांचा लाभ घेतला आहे, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.

विशेष म्हणजे, बाब म्हणजे महापालिकेच्या जी/उत्तर विभागात धारावीसारखा झोपडपट्टी बहुल, घनदाट लोकसंख्येचा परिसरात एकूण १५ आपला दवाखाने आणि २ डायग्नोस्टिक केंद्र असून त्यांच्या माध्यमातून म्हणजे अशा १७ दवाखान्यांमधून १ लाख ४ हजार ७४६ इतक्या लाभार्थ्यांची नोंद करण्यात आली आहे. कोविड संसर्ग कालावधीमध्ये या विभागातील महापालिकेच्या आरोग्य सेवेची वाखाणणी झाली. या भागातील गरज लक्षात घेता अधिकाधिक नागरिकांना कोविड पश्चात कालावधीमध्ये देखील आरोग्य सेवा मिळाली पाहिजे, अशा सूचना विद्यमान सरकारने दिल्या होत्या. त्यास अनुसरुन महापालिकेने दवाखाने सुरु केले आणि तेथील लाभार्थ्यांची संख्या वाढत आहे.

‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजनेद्वारे मोफत वैद्यकीय तपासणी, औषधोपचार, किरकोळ जखमांवर मलमपट्टी यासह १४७ प्रकारच्या रक्त चाचण्यांची सेवा मोफत उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या व्यतिरिक्त क्ष-किरण (एक्स-रे), सोनोग्राफी इत्यादी चाचण्यांकरिता पॅनलवरील डायग्नोस्टिक केंद्रांद्वारे मुंबई महापालिकेच्या दरात संबंधित वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. त्याचबरोबर विशेष तज्ज्ञांच्या सेवा देखील पॉली क्लिनिक व डायग्नॉस्टिक सेंटरद्वारे उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

पेपरलेस पद्धतीने नोंद

या दवाखान्यांमधून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे व टॅब आधारित पद्धतीने सॉफ्टवेअरच्या माध्यमातून रुग्णांची माहिती, आजाराचा तपशील, औषधांचा साठा व वितरण तसेच संदर्भित केलेल्या निदान सुविधा यांचा तपशिल नोंदविण्यात येत आहे. यामुळे आपल्या दवाखान्यांचे कामकाज हे विनाकागद अर्थात पेपरलेस पद्धतीने व पर्यायाने पर्यावरणपूरक होत आहे, अशी माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. (श्रीमती) मंगला गोमारे यांनी दिली आहे.


हेही वाचा : चोरलेला धनुष्यबाण घेऊन या, आम्ही मशाल घेऊन येतो, मग बघू.., ठाकरेंचं थेट शिंदेंना आव्हान


 

First Published on: February 23, 2023 10:28 PM
Exit mobile version