एका दिवसात 4 आत्महत्या; अल्पवयीन मुलीसह चौघांनी उचलले टोकाचे पाऊल

एका दिवसात 4 आत्महत्या; अल्पवयीन मुलीसह चौघांनी उचलले टोकाचे पाऊल

नाशिक : मागील काही वर्षात आत्महत्या करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. यात प्रामुख्याने युवक युवतींची संख्या मोठी असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत असल्याने ही चिंतेची बाब मानली जात आहे. नाशिक शहरात 3 तर सिन्नर तालुक्यात 1 अक्षय चार आत्महत्येच्या घटना एकाच दिवशी घडल्या आहेत.

टवाळखोरांच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या 

सिन्नर तालुक्यातील शहा येथील 17 वर्षीय मुलीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी ( दि. 22) मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास उघडकीस आला. पोलिसांना सुसाईड नोट सापडली असून, त्यात तिने गावातील तीन तरुणांकडून त्रास होत असल्याचे नमूद केले होते. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी थेट वावी पोलीस ठाण्यात मोर्चा काढत मृत मुलीचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. मात्र, पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांनी कारवाईचे आश्वासन दिले. त्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी तिच्या वडिलांच्या तक्रारीवरून वावी पोलीस ठाण्यात तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. वैभव विलास गोराणे (१८), अंकुश शिवाजी धुळसैंदर (१८)अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

१९ वर्षीय तरुणीने घेतला गळफास

नाशिक शहरातील पाथर्डी फाटा परिसरातील दामोधर नगर भागात राहणार्‍या १९ वर्षीय तरुणीने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि.२२) दुपारी १२.३० वाजेदरम्यान घडली. आत्महत्या करण्यामागचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. माधुरी विलास गाडे (रा.साई दर्शन रो हाऊस,दामोधरनगर) असे मृत तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माधुरी गाडे हिने मंगळवारी (दि.२२) दुपारी राहत्या घरातील बेडरूममध्ये गळफास लावून घेतला. ही बाब निदर्शनास येताच वडील विलास गाडे यांनी तिला तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करत तिला मृत घोषित केले. पुढील तपास इंदिरानगर पोलीस करीत आहेत.

२० वर्षाच्या तरुणाने संपवली जीवनयात्रा

 अंबडमधील २० वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्या करण्यामागचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. विवेक दत्तू आहेर (रा. अंबड) असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवेकने मंगळवारी (दि.२१) राहत्या घरात गळफास लावून घेतला. ही बाब निदर्शनास येताच कुटुंबियांनी त्याला तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करत मृत घोषित केले. पुढील तपास अंबड पोलीस करीत आहेत. दरम्यान, शहरात दिवसेंदिवस एकटेपणा, प्रेमभंग, वाढत्या अपेक्षा, छळ व नैराश्यातून आबालवृद्धांमध्ये गळफास व विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याच्या घटनांत वाढ होत आहे. वाढत्या आत्महत्येच्या घटनांमुळे कुटुंबीय व नातेवाईकांमध्ये चितेंचे वातावरण आहे.

४० वर्षीय प्रवीणची आत्महत्या

नवीन नाशिक येथील युवकाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्या करण्यामागचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. प्रविण विनायक पाटील (४० रा. सिंहस्थनगर, अंबड) असे मृत युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटील यांनी सोमवारी (दि.२१) सकाळच्या सुमारास राहत्या घरातील किचनमध्ये लोखंडी हुकाला दोरी बांधून गळफास लावून घेतला. ही बाब निदर्शनास येताच बाळकृष्ण पाटील यांनी त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले. वैद्यकीय सुत्रांनी त्यांना मृत घोषित केले. पुढील तपास पोलीस नाईक शिरवले करीत आहेत.

First Published on: August 23, 2023 7:27 PM
Exit mobile version