४९ वी राज्य अजिंक्यपद ज्युदो स्पर्धा; पुणे सांघिक विजेता, तर ठाणे उपविजेता

४९ वी राज्य अजिंक्यपद ज्युदो स्पर्धा; पुणे सांघिक विजेता, तर  ठाणे उपविजेता

नाशिक : पुनित बालन ग्रुप यांच्या सहयोगाने आणि महाराष्ट्र ज्युदो असोसिएशन आणि नाशिक जिल्हा ज्युदो असोसिएशन आयोजित ४९ व्या महाराष्ट्र राज्य ज्युदो अजिंक्यपद स्पर्धेमध्ये पीडीजेए पुणे संघाने तीन सुवर्ण, एक रौप्य आणि चार कांस्य पदकांसह चार अधिक गुण घेतल्यामुळे सांघिक विजेतेपदाचा दावेदार ठरला. तर ठाणे संघाने दोन सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कांस्य मिळवून द्वितीय स्थान मिळविले.

पुरुषांच्या ६६ किलो गटात नाशिकच्या अजिंक्य वैद्यने कोल्हापूरच्या अनमोल पालकरला मॅटवर लोळवले आणि होल्डमधील केसा गातामे डावाचा वापर करत मॅटवर २० सेकंदे जखडून ठेवत सुवर्ण पटकावले. राज्य स्पर्धेतील हे अजिंक्यचे चौथे सुवर्ण पदक असून त्याने सातत्य राखत राज्यातील अव्वल स्थान अबाधित ठेवले. पुरुषांच्या ८१ किलो गटात अहमनगरच्या आदित्य धोपावकरने अंतिम लढतीत सोलापूरच्या प्रदीप गायकवाडला होल्डमधील केसा गातामे डावाचा वापर करत २० सेकंदे जखडून ठेवत सुवर्ण पटकावले. नगरच्या आदित्यचे राज्य स्पर्धेतील हे १९ वे सुवर्ण पदक असून बाल गटापासून खेळलेल्या प्रत्येक स्पर्धेत त्याने सुवर्ण पदकाची परंपरा कायम राखली. महिलांच्या ४८ किलो गटात सातार्‍याची अंतरराष्ट्रीय ज्युदोपटू रोहिणी मोहितेने अंतिम लढतीत राज्याची आंतरराष्ट्रीय खेळाडू शायना देशपांडेला को-ऊची माकेकोमी डावाने आक्रमण करून वाझाआरी गुण घेतला आणि विजय संपादन केला.

स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद पटकावणार्‍या पुणे संघाला महाराष्ट्र ज्युदो संघटनेचे तांत्रिक समिती सचिव दत्ता आफळे यांच्या हस्ते मानाचा विजेता चषक प्रदान करण्यात आला. तर उपविजेता ठाणे संघाला नाशिकचे ज्येष्ठ क्रीडा संघटक आणि ज्युदो संघटनेचे सचिव डॉ. रत्नाकर पटवर्धन यांच्या हस्ते चषक प्रदान करण्यात आला. यावेळी डॉ. सतीश पहाडे, रवी मेतकर, विजय पाटील, रवी पाटील, अर्चना पहाडे, जयेंद्र साखरे, माधव भट यांसह स्टेडियम व्यवस्थापक ताम्हणकर उपस्थित होते.
सूत्रसंचालन ऋषिकेश वाघचौरे यांनी केले. स्पर्धा आयोजनाबद्दल महाराष्ट्र ज्युदो संघटनेने नाशिक जिल्हा ज्युदो असोसिएशनचे योगेश शिंदे, सुहास मैद, स्वप्नील शिंदे, नामदेव कचरे भगवान दराडे, तुषार मालोदे, सानू पाठक, गौरव पगारे आदींचे आभार मानले.

स्पर्धेचा निकाल असा..

सर्वसाधारण विजेता संघ : पुणे
सर्वसाधारण उपविजेता संघ : ठाणे

स्पर्धेचा गटवार निकाल असा :
First Published on: August 11, 2022 1:35 PM
Exit mobile version