समृध्दी महामार्गामुळे ५० एकर शेती पाण्याखाली

समृध्दी महामार्गामुळे ५० एकर शेती पाण्याखाली

नाशिक : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या समृध्दी महामार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. जिल्ह्यातील सिन्नर आणि इगतपुरी तालुक्यातून हा महामार्ग जात असून डिसेंबर अखेर काम पूर्ण करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. मात्र या मार्गातील नैसर्गिक पाण्याचे प्रवाह बुजवले जात असल्याने सिन्नरजवळ या महामार्गावरील पाण्याला मार्ग मिळत नसल्याने हे पाणी शेतात जाऊन शेतीचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे महाराष्ट्राची समृध्दी की शेतकर्‍यांची बरबादी असा सवाल शेतकर्‍यांनी उपस्थित केला आहे.

गेल्या तीन वर्षांपासून नाशिकच्या सिन्नर परिसरात समृद्धीचे कामकाज सुरु आहे. या परिसरातील अनेक गावातून समृद्धीच्या महामार्ग गेला आहे. या शेतकर्‍यांच्या जमिनींना मोबदला देऊन संपादित केल्या आहेत. दरम्यान आता समृद्धीचे कामही प्रगतीपथावर आहे. मात्र सध्या सुरु असलेल्या कामाच्या पाणी हे स्थानिक परिसरातील शेतकर्‍यांच्या थेट शेतात घुसल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे. सध्या या महामार्गाचे काम प्रगतीपथावर असून समृद्धी महामार्गाच्या सदोष कामामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे समोर आले आहे. महामार्ग बनविताना अनेक नैसर्गिक प्रवाह अडले गेले आहेत. त्यामुळे पाऊस सुरु झाल्यानंतर नैसर्गिक प्रवाह अडले गेल्याने हे पाणी थेट त्या ठिकाणच्या शेतकर्‍यांच्या शेतात घुसले आहे. पाण्याला मार्ग नसल्याने अडलेले पाणी शेतात शिरले आहे. यामुळे शेतातील मका, सोयाबीन, ऊस, गुरांचा चारा आदी पिकांचे नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणची पिकं सडली, तर काही ठिकाणी पाण्यामुळे पेरणीच नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सिन्नर परिसरातील दुशिंंगवाडी नजीक शेतकर्‍यांची पिके खराब झाली असल्याने हंगामाच वाया गेल्याने शेतकर्‍यांनी चिंता व्यक्त केली आहे. शिवाय शेतात घुसलेल्या पाण्याची योग्य प्रकारे विल्हेवाट न लावल्यास उपोषणाला बसू असा इशारा शेतकर्‍यांकडून देण्यात आला आहे.

    सिन्नर परिसरात नुकसान झालेल्या शेतकर्‍यांनी समस्या मार्गी लावण्याची मागणी महामार्ग व्यवस्थापन व सरकारकडे केली आहे. सिन्नर तालुक्यातील वावी, दुशिंगपुर, सायळे, निर्‍हाळे अशा अनेक गावातील शेतकर्‍यांचा प्रश्न असून दोघेही सत्तेच्या मुख्य पदावर असल्यानं शेतकर्‍यांकडे लक्ष देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. दरम्यान समृद्धीचे पाणी शेतात घुसून नुकसान होत असल्याच्या शेतकर्‍यांच्या तक्रारींची प्रत्यक्ष जागेवर जात पाहणी करून खात्री केली जाईल. या संदर्भात वरिष्ठांना अहवाल पाठवून उपाययोजना करण्यासंदर्भात निर्णय घेऊ, अशी माहिती एमएसआरडीसीचे उपअभियंता निंबादास बोरसे यांनी दिली आहे.

First Published on: August 12, 2022 12:49 PM
Exit mobile version