केडीएमसीतील वैद्यकीय अधिकारी दाम्पत्यांची 57 लाखांची फसवणूक

केडीएमसीतील वैद्यकीय अधिकारी दाम्पत्यांची 57 लाखांची फसवणूक

कल्याण । बाई रुक्मिणी रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी तसेच पालिकेच्या वसंत व्हॅली रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी असणाऱ्या दांपत्यांना बांधकाम विकासाकांनी दुकान गाळे विक्रीतून 57 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. डॉक्टर पुरुषोत्तम टिके आणि डॉक्टर प्रज्ञा टिके असे फसवणूक झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची नावे असून ते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वैद्यकीय सेवेत कार्यरत आहेत.

कल्याण पश्चिम येथील बेतुरकर पाडा विभागातील त्रिमूर्ती सोसायटी या संकुलामधील दोन व्यापारी गाळे संजय पटेल यांनी राजेश कुमार शर्मा यांना विक्री केले होते. हे गाळे विक्री झाल्याचे माहिती असतानाही बांधकाम व्यावसायिक असलेले मोहनलाल पटेल, जतीन पटेल, अंकित पटेल आणि मनसुख वसानी या चार जणांनी आपसात संगनमत करीत डॉक्टर टिके या दांपत्यांना गाळे विक्रीचे रजिस्ट्रेशन करून देत त्यांच्याकडून 56 लाख 90 हजार रुपयाची फसवणूक एप्रिल महिन्यापासून करण्यात आली होती.

याप्रकरणी आपली फसवणूक झाल्याचे डॉक्टर टिके यांच्या लक्षात आल्याने त्यांनी महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनमध्ये या चौघांनी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. बेतुरकर पाड्यातील गाळा नंबर 101 व 102 हे दोन्ही गाळे यापूर्वीच राजेश कुमार शर्मा यांनी एक कोटी 45 लाख रुपयांना विकत घेतले होते. गाळे विकत घेतल्याचा व्यवहार बांधकाम व्यवसायिकांना माहीत असतानाही या चौघांनी संगनमत करीत डॉक्टर टिके या दाम्पत्यांना जवळजवळ 57 लाख रुपयाला गंडा घातला आहे. बांधकाम व्यवसायिक असणारे मोहनलाल पटेल यांच्या समवेत त्यांची दोन मुले राहणार कासार वडवली घोडबंदर रोड तसेच चौथा भागीदार असणारा मनसुख वसानी याच्या राहण्याबाबतच ठिकाण नमूद नसून याप्रकरणी महात्मा फुले पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक डी एम वाघमारे याबाबत अधिक तपास करीत आहेत.

First Published on: December 5, 2022 10:01 PM
Exit mobile version