इंटरनेट क्रांतीची पंचमी

इंटरनेट क्रांतीची पंचमी

देशभरातील १३ शहरांमध्ये सर्वाधिक वेगवान ५जी इंटरनेट सेवेचा प्रारंभ करीत भारताने शनिवारी इंटरनेट क्षेत्रात नव्या क्रांतीचे शिखर सर केले. २जी, ३जी, ४जी आणि त्यानंतर ५जी इंटरनेट सेवेचा प्रारंभ करीत भारताने शनिवारी इंटरनेट क्षेत्रात क्रांतीची पंचमी साजरी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर ५जी इंटरनेट सेवेचा प्रारंभ करण्यात आला. केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री देवुसिंह चौहान, रिलायन्स उद्योगाचे अध्यक्ष मुकेश अंबानी, भारती एंटरप्रायजेसचे अध्यक्ष सुनील मित्तल, आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला, दूरसंवाद विभागाचे सचिव के. राजारामन आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी पंतप्रधान म्हणाले की, काही लोकांनी माझ्या ‘आत्मनिर्भर भारत व्हिजन’ची चेष्टा केली. गरिबांना डिजिटलचा अर्थही समजणार नाही असे काहींना वाटत होते, पण ही ५जी सेवा आता डिजिटल इंडिया आणि आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल आहे. ही एका नव्या युगाची नांदी आहे. ही केवळ सरकारी योजना आहे असे काहींना वाटते, पण डिजिटल भारत हे केवळ एक नाव नाही, तर देशाच्या विकासासाठीचा तो एक मोठा दृष्टिकोन आहे. मूठभर उच्चभ्रू वर्गाने गरिबांना डिजिटलचा अर्थ तरी समजेल का, असा प्रश्न विचारला आणि त्यांच्या क्षमतेवर शंका घेतली होती, पण देशातील सामान्य माणसाची समज, शहाणपण आणि जिज्ञासूपणा यावर आपला नेहमीच विश्वास होता. देशातील गरीब जनता नेहमीच नवीन तंत्रज्ञान स्वीकारायला तयार असल्याचे आढळले, असेही त्यांनी सांगितले.

या शहरांमध्ये ५जी
दिल्ली, मुंबई, पुणे, अहमदाबाद, बंगळुरू, चंदिगड, गांधीनगर, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, चेन्नई, गुरुग्राम, लखनऊ

५जीची वैशिष्ठ्ये
* ४जी सेवेच्या तुलनेत १० पट अधिक वेगवान इंटरनेट सेवा
* इंटरनेट कॉलिंगमधील व्यत्ययही संपुष्टात येण्याची चिन्हे
* मोठे व्हिडीओही त्वरित डाऊनलोड करणे शक्य
* गेमिंग जग बदलण्यास मदत होणार
* दुर्गम भागात शैक्षणिक सेवा आणि आरोग्य सेवा पोहचणे सोपे होणार
* कृषी क्षेत्रात ड्रोनसह इतर महत्त्वाच्या उपकरणांचा वापर करणे शक्य

५जीचा वापर शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी करा – मुख्यमंत्री

५जी सेवेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरातील पोदी येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शाळेत उपस्थित राहून या सेवेची सुरुवात केली आणि विद्यार्थी, शिक्षकांशी मनमोकळेपणाने संवाद साधला. या सेवेचा फायदा आपल्या सुरक्षिततेसाठी, दर्जेदार शिक्षणाकरिता करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले. यामध्ये मनोरंजन, सिनेमा आणि गेम आहेतच, पण त्यातील चांगल्या बाबी घ्या, बाकी वगळा, असा सल्लाही त्यांनी दिला. या सेवेतील शिक्षणाशी निगडित प्रयोग रायगड जिल्ह्यात पनवेल येथे होत असल्याबद्दल शिंदे यांनी पंतप्रधानांसह केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव तसेच त्यांच्या सहकार्‍यांना धन्यवाद दिले. ज्या ठिकाणी नेट नाही तेथे आता ते सहजपणे मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

५जीच्या माध्यमातून सगळ्या शाळा एकमेकांशी जोडल्या जातील. त्यामुळे शैक्षणिक दर्जा उंचावला जाऊ शकतो. शिक्षकांसाठी हे उपयुक्त माध्यम आहे. त्यांचेही प्रशिक्षण या माध्यमातून करण्यात येईल. वैद्यकीय क्षेत्रातदेखील यामुळे क्रांती घडेल. शाळांप्रमाणे विविध क्षेत्रांत ५ जीमुळे क्रांतिकारी बदल घडणार असल्याचे शिंदे म्हणाले. यावेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार महेंद्र थोरवे, प्रधान सचिव भूषण गगराणी, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ, प्रकाश बिनेदार, तेजस कांडपिळे, सुशीला घरत आदी उपस्थित होते.

..अन् विद्यार्थ्यांसोबत मुख्यमंत्रीही झाले विद्यार्थी
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी स्वतः विद्यार्थी बनले. खुर्चीऐवजी त्यांनी बेंचवर बसणे पसंत केले आणि विद्यार्थ्यांशी गप्पा मारताना मुख्यमंत्र्यांनी ५जीचे महत्त्व सांगितले. क्रांतिकारक क्षणाचे आपण साक्षीदार असल्याचे सांगत शिक्षण, कृषी, आरोग्य, बँकिंग यासह सर्वच क्षेत्रांत ५जी तंत्रज्ञानाने क्रांती होणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

First Published on: October 2, 2022 4:07 AM
Exit mobile version