धक्कादायक! ६ महिन्यांच्या चिमुरडीचा Mucormycosis नं मृत्यू; राज्यातील पहिलीचं घटना

धक्कादायक! ६ महिन्यांच्या चिमुरडीचा Mucormycosis नं मृत्यू; राज्यातील पहिलीचं घटना

प्रातिनिधीक फोटो

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असताना म्युकरमायकोसिस( mucormycosis) अर्थात काळ्या बुरशीने राज्यात थैमान घातले आहे. मुंबईसह राज्यभरात म्युकरमायकोसिस या आजाराचे मोठ्याप्रमाणात रूग्ण आढळून येत आहे. यासह काळ्या बुरशीचा आजार हा लहान मुले, तरुण, वृद्ध सर्वांमध्ये दिसून येत असल्याने अधिक चिंता वाढत आहे. रविवारी मुंबईच्या कूपर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या १४ वर्षींय मुलीला काळ्या बुरशीच्या जीवघेण्या आजारामुळे आपला डोळा गमवावा लागल्याची घटना घडल्यानंतर ६ महिन्यांच्या चिमुरडीचा Mucormycosis ने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ही राज्यातील पहिलीच घटना असल्याचे सांगितले जात आहे.

असा घडला प्रकार

अहमदनगर जिल्ह्यातील लोणी येथील प्रवरा ग्रामीण रूग्णालयात उपचार घेत असताना ६ महिन्यांच्या चिमुरडीचा म्युकरमायकोसिस या आजाराने मृत्यू झाला आहे. या लहान मुलीला वाचवण्यासाठी प्रवरा ग्रामीण रूग्णालयातील सर्व डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र या प्रयत्नाना यश न आल्याने ही धक्कादायक घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, म्युकरमायकोसिस या आजाराने मृत्यू झालेल्या सहा महिन्याच्या चिमुरडीचे नाव श्रद्धा कोकरे असे आहे. ही घटना मंगळवारी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रूग्णालयात घडली. या मुलीचे संपूर्ण कुटुंब शिर्डी येथे राहतं. या चिमुकलीला काहीसा त्रास जाणवल्यानंतर तिला कोपर गाव येथे दाखवण्यात आलं होतं, त्यानंतर नाशिकमध्ये देखील तिला उपचारांसाठी नेण्यात आलं होतं. यावेळी या चिमुकलीची कोरोना अँटीजेन टेस्ट करण्यात आली होती. मात्र ती निगेटिव्ह आल्याची माहिती मिळतेय. त्यानंतर तिची प्रकृती खालवली आणि तिच्यावर उपचार करण्यात आले, यादरम्यान तिला म्युकरमायकोसिस या आजाराने ग्रासल्याचे उघड झाले. यानंतर म्युकरमायकोसिसवरील उपचार प्रवरा ग्रामीण रूग्णालयात केले जातील असे समजल्यानंतर कुटुंबियांनी तिला येथे दाखल केलं. मात्र आज उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.


First Published on: June 15, 2021 4:04 PM
Exit mobile version