राष्ट्रवादीनं पळवले शिवसेनेचे ५ नगरसेवक, अजित पवारांनी दिला प्रवेश!

राष्ट्रवादीनं पळवले शिवसेनेचे ५ नगरसेवक, अजित पवारांनी दिला प्रवेश!

शिवसेनेच्या पाच नगरसेवक आणि शिवसेनेच्या महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख उमाताई बोरुडे यांनी शनिवारी दुपारी बारामतीत जात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शिवसेनेचे नगरसेवक राष्ट्रवादीच्या गोटात सामील झाल्याने शहरात आमदार निलेश लंके यांचे वर्चस्व वाढले आहे. माजी आमदार विजय औटी यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे.

नगरसेवक डॉ. मुदस्सीर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी, नंदा देशमाने या नगरसेवकांनी आणि महिला आघाडीच्या तालुका प्रमुख उमाताई बोरुडे यांनी शनिवारी शिवसेनेच्या धनुष्याची साथ सोडत राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले आहे. येत्या काही दिवसांत पारनेर नगर पंचायतीची मुदत संपत आहे. या पार्श्वभूमीवर या नगरसेवकांनी घेतलेल्या निर्णयाला महत्व आले आहे. पारनेर नगर परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकावण्यासाठी आमदार लंके यांनी कंबर कसली असून त्यादृष्टीने नियोजन केले आहे. या नगरसेवकांचा पक्षप्रवेश हा त्याचाच एक भाग आहे.

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेतून बाहेर पडलेल्या लंके यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढत विक्रमी मतांनी औटी यांचा पराभव केला होता. त्यानंतर त्यांनी पारनेर शहराच्या राजकारणात लक्ष घातले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशासाठी आमदार लंके आपल्या कार्यकर्त्यांच्या लवाजम्यासह बारामतीला गेले होते. नगरसेवक आणि महिला आघाडीच्या प्रमुखाशिवाय उद्योजक सहदेव तराळ, शैलेश औटी, संतोष गंधाडे, राजेश चेडेदेखील त्यांच्यासोबत होते. या सर्वांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. या सर्वांचा राष्ट्रवादी प्रवेश करत आमदार लंके यांनी पारनेरमध्ये माजी आमदार विजय औटी यांना मोठा धक्का दिला आहे.

First Published on: July 4, 2020 6:38 PM
Exit mobile version