राज्यात ओमायक्रॉनचे 7 नवे रुग्ण सापडले

राज्यात ओमायक्रॉनचे 7 नवे रुग्ण सापडले

राज्यात ओमायक्रॉन संसर्गाचे शुक्रवारी आणखी ७ रुग्ण आढळले. यातील ३ रुग्ण मुंबईचे तर ४ रुग्ण पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील आहेत. यामुळे राज्यातील एकूण ओमायक्रॉन विषाणूबाधित रुग्णांची संख्या आता १७ झाली आहे. मुंबईत आढळलेले रुग्ण टांझानिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका-नैरोबी येथून आलेले आहेत. तर पिंपरी-चिंचवडमध्ये आढळलेले ४ ही रुग्ण हे नायजेरियावरून आलेल्या ओमायक्रॉन बाधित आढळलेल्या महिलेचे येथील नातेवाईक आहेत.

मुंबईमध्ये शुक्रवारी ओमायक्रॉनचे तीन रुग्ण सापडल्याने मुंबईतील रुग्णांची संख्या 5 वर पोहोचली आहे. तर पिंपरी-चिंचवडमध्ये 4 रुग्ण सापडल्याने तेथील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 10 वर पोहोचली आहे. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार, मुंबईमध्ये टांझानिया येथून 4 डिसेंबरला आलेल्या 48 वर्षीय पुरुषाने कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्याचे नमुने जनुकीय विश्लेषणासाठी पाठविण्यात आला होता. ही व्यक्ती मुंबईच्या धारावी परिसरातील असल्याने मुंबईमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या व्यक्तीने कोविड लसीची एकही मात्रा घेतलेली नव्हता. त्याला सौम्य लक्षणे असल्याने त्याला सेव्हन हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या रुग्णाच्या अतिजोखमीच्या संपर्कातील 2 व्यक्तींची चाचणी करण्यात आली. मात्र, त्यापैकी कोणीही कोरोनाबाधित नाही. मुंबईत सापडलेला दुसरा ओमायक्रॉनचा रुग्ण हा लंडन येथून 1 डिसेंबरला भारतात आला आहे. 25 वर्षीय या तरुणाने त्याने लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या आहेत. त्याच्या निकटच्या संपर्कातील एकाही व्यक्तीला कोरोनाची बाधा नसल्याचे तपासणीत आढळून आले आहे. मुंबईत सापडलेली तिसरी व्यक्तीही गुजरातची रहिवासी असून, 37 वर्षीय हा पुरुष 4 डिसेंबरला दक्षिण आफ्रिकेच्या नैरोबी या देशातून मुंबईत आला. त्याला सौम्य लक्षणे असल्याने व त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह असल्याने त्याला विमानतळावरूनच रुग्णालयात दाखल करण्यात आले. या रुग्णाने लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या आहेत. या सर्व रुग्णांना मुंबई महापालिकेच्या सेवन हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये मागील आठवड्यात नायजेरियातून आपल्या भावाला भेटण्यासाठी आलेल्या महिलेच्या नातेवाईकांनाच ओमायक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये एका साडेतीन वर्षाच्या रुग्णाचा समावेश आहे. त्याने कोरोनाची एकही लस घेतलेली नाही. तसेच या चार रुग्णांमध्ये एकाला सौम्य लक्षण असून, तिघे लक्षणेविरहित आहेत.

ओमायक्रॉनचे आतापर्यंत सापडलेले रुग्ण
पिंपरी-चिंचवड 10
मुंबई- 5
डोंबिवली- 1
पुणे- 1

First Published on: December 11, 2021 5:15 AM
Exit mobile version