महिलांवर फुगे फेकणाऱ्या ८४ तरुणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

महिलांवर फुगे फेकणाऱ्या ८४ तरुणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

पोलिसांनी केलेली कारवाई

देशभरात होळीचा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जात आहे. या सणाला गालबोट लागू नये याची काळजी पोलिसांकडून घेतली जात आहे. दरम्यान हुल्लडबाजी करत महिलांच्या अंगावर रंगाचे फुगे फोडणाऱ्या ८४ तरुणांना वाकड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे त्यांची धुळवड वाकड पोलीस ठाण्यात असणार आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी दिली आहे. हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना वाकड परिसरातून ताब्यात घेण्यात आलं आहे. होळीच्या सणादरम्यान वाकड पोलिसांनी केलेली ही एक मोठी कारवाई आहे.

कलम ६८ अंतर्गत केली कारवाई

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीत धुळवड साजरी करत असताना सार्वजनिक तसेच चौकामधून जाणाऱ्या महिलांच्या अंगावर रंगाचे फुगे फोडणाऱ्या ८४ तरुणांना वाकड पोलिसांनी ताब्यात घेतलंय, त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ६८ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांवर लक्ष ठेवून ही कारवाई करण्यात आली. यासाठी वाकड पोलीस ठाण्यातील ९ पथक त्यात ७ अधिकारी आणि ७५ कर्मचारी सहभागी होते.ही कामगिरी वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ही कारवाई संध्याकाळ पर्यंत सुरूच राहणार असल्याचे माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, ताब्यात घेतलेल्या तरुणांना आज पोलीस ठाण्यात बसवून ठेवणार आहेत.
First Published on: March 21, 2019 3:14 PM
Exit mobile version