राज्यातील नववी ते बारावीचे ८८ टक्के वर्ग सुरू; विद्यार्थ्यांची उपस्थिती २७ टक्के

राज्यातील नववी ते बारावीचे ८८ टक्के वर्ग सुरू; विद्यार्थ्यांची उपस्थिती २७ टक्के

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती काळजी घेत शिक्षण विभागाने २३ नोव्हेंबरला ९ ते १२ वीचे राज्यभरातील वर्ग सुरू केले. शाळा सुरू झाल्यापासून ४३ दिवसांमध्ये राज्यातील तब्बल ८८ टक्के शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र विद्यार्थ्यांची उपस्थिती अवघी २७.८ टक्के इतकी आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना प्रादुर्भाव कमी होत असला तरी पालक विद्यार्थ्यांना शाळेमध्ये पाठवण्यास उत्सूक नसल्याचे दिसून येत आहे. मात्र पहिल्या दिवसाच्या तुलनेत शाळेत जाणार्‍या विद्यार्थ्यांच्या संख्येत सात पटीने वाढ झाली आहे.

नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी राज्य सरकारने २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू केल्या. २३ नोव्हेंबरला मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे या शहरातील शाळा वगळता राज्यातील शाळा सुरू झाल्या. राज्यातील २२ हजार २०४ शाळांपैकी ९ हजार १२७ शाळा पहिल्या दिवशी सुरू झाल्या. या शाळांमध्ये २ लाख ९९ हजार १९३ विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवली होती. योग्य ती काळजी व मार्गदर्शक सूचनांचे पालन करत विद्यार्थ्यंची संख्या वाढवण्याचे शाळांकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र शाळा सुरू झाल्यातरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याबाबत पालक अद्यापही अनुत्साही असल्याचे दिसून येत आहे. नववी ते बारावीचे वर्ग सुरू होऊन तब्बल ४३ दिवस उलटल्यानंतर शाळा सुरू होण्याच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. राज्यातील तब्बल १९ हजार ५२४ शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र या शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती फारच अल्प आहे. आतापर्यंत शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती २७.८ टक्के इतकी झाली आहे. शाळांमधील विद्यार्थ्यांच्या उपस्थिती हळूहळू वाढत असली तरी ती फारशी समाधानकारक नसल्याचे दिसून येते. राज्यातील तब्बल १९ हजार ५२४ शाळांमध्ये नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले असून, त्यामध्ये १५ लाख ७० हजार ८०७ विद्यार्थी उपस्थित आहेत.

उपस्थिती ५० टक्क्यांपेक्षा अधिक असलेले जिल्हे

जळगावमध्ये १०० टक्के शाळा सुरू झाल्या असल्या तरी विद्यार्थ्यांची उपस्थिती ही फक्त ५३.२ टक्के इतकी आहे. परभणी ८५.८ टक्के, कोल्हापूर ६४.४ टक्के, जालना ५३.१ टक्के, सोलापूर ५१.४ टक्के, रत्नागिरी ५०.२ टक्के लातूर ५२ टक्के, उस्मानाबाद ३५.४,रत्नागिरी ५०.२, गडचिरोली ३७.३ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे.

 

First Published on: January 5, 2021 7:16 PM
Exit mobile version