नववी, अकरावीचे विद्यार्थी सरसकट पास; १० वी, १२ वीच्या परीक्षा ऑफलाईनच 

नववी, अकरावीचे विद्यार्थी सरसकट पास; १० वी, १२ वीच्या परीक्षा ऑफलाईनच 

महाराष्ट्रात कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर, मागील शनिवारी इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना कोणतीही परीक्षा न देता थेट पुढील इयत्तेत प्रवेश दिला जाणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यापाठोपाठ आता शिक्षण विभागाने नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना खुशखबर दिली आहे. या दोन्ही इयत्तांच्या विद्यार्थ्यांनाही सरसकट पास करण्यात येणार आहे. तसेच १० वी आणि १२ वी च्या परीक्षा ऑफलाईनच होणार आहेत.

कोरोनामुळे यंदा संपूर्ण वर्ष विद्यार्थ्यांसाठी शाळा बंद होत्या. तसेच कॉलेजसही बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यात येत होते. मात्र, असे असतानाही १० वी आणि १२ वीच्या परीक्षा ऑफलाईन होणार असल्याची घोषणा मागील शनिवारी राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली होती. परंतु, परीक्षा ऑफलाईन घेण्याला विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवताना आंदोलने केली. मात्र, असे असतानाही शिक्षण विभागाने परीक्षा ऑफलाईनच घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णयाची घोषणा केली जाईल.

कोरोनाच्या परिस्थितीचा विचार करून आणि विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता शालेय शिक्षण विभागाने राज्य मंडळाशी संलग्न असणाऱ्या शाळांमधील नववी आणि अकरावीच्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्गात वर्गोन्नती देण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयीच्या मार्गदर्शक सूचना लवकरच जाहीर केल्या जातील. या शैक्षणिक वर्षाच्या काळात राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्यामुळे येणाऱ्या कालावधीत पुढील शैक्षणिक वर्षामध्ये मागील वर्षातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणेमार्फत कार्यक्रम आखण्यात येईल व त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याकडे शासन विशेष लक्ष देईल.

First Published on: April 7, 2021 4:25 PM
Exit mobile version