कर्जवसुलीची नोकरी करणाऱ्या भावाला सोबत म्हणून गेला अन् ऍसिड हल्ला झाला; तरुणाचा दुर्दैवी अंत

कर्जवसुलीची नोकरी करणाऱ्या भावाला सोबत म्हणून गेला अन् ऍसिड हल्ला झाला; तरुणाचा दुर्दैवी अंत

नाशिक : दि.३१ मे रोजी अंबड औद्योगिक वसाहतीत एका खाजगी फायनान्स कंपनीच्या थकीत कर्जाच्या हप्ता वसुलीसाठी गेलेल्या वसुली कर्मचाऱ्यासह त्याच्या मोठ्या भावावर थकबाकीदाराने ऍसिड फेकून हल्ला केल्याचा प्रकार घडला होता. या ऍसिड हल्ल्यात खासगी वसुली कर्मचारी गणेश फाफळे (वय ३१, विडी कामगार नगर) यांच्यासह त्यांचे मोठे बंधू किरण फाफळे (वय ४० रा. नवीन नाशिक) हे देखील जखमी झाले होते.

त्यांना त्वरित उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर किरण फाफळे यांच्यावर नाशिक शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरू होते. काही दिवसांनी किरण फापाळे यांनी रुग्णालयातून घरी येण्याचा निर्णय घेतला. परंतु पुन्हा अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल झाले. त्यांची परिस्थिती हलाकीची असल्याने त्यांनी पूर्ण बरे वाटत नसतानाही दोन दिवसांपूर्वी रुग्णालयातून घरी जाण्याचा निर्णय घेतला होता.

शनिवारी किरण फाफळे यांना अचानक पोटात दुखू लागले व चक्कर येऊ लागल्याने त्यांना पुन्हा एकदा पुढील उपचारासाठी लेखानगर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेत असतांना रुग्णालयात पोहचण्या आधीच त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते आहे. यावेळी मयत किरण फाफळे यांच्या नातेवाईकांनी ऍसिड हल्ला करणाऱ्या तरुणावर कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तरीही सध्या अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते. या प्रकरणाचा वैद्यकीय अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे चुंचाळे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू पाचोरकर यांच्याकडून सांगण्यात आले आहे. मयत किरण फापळे यांच्या पश्चात वडील पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.

परिस्थिती अभावी घेतला डिस्चार्ज 

किरण फाफळे सिडको परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र, रुग्णालयाचे बिल वाढत असल्याने पूर्णतः बरे वाटत नसतांनाही त्यांनी आर्थिक चणचणीमुळे दोन दिवसापूर्वी रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला होता. मात्र, शनिवारी (दि. २४) पुन्हा अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना पुन्हा हॉस्पिटल मध्ये भरती करण्यात आले. रुग्णालायत नेत असतानाच त्यांची प्राणज्योत मावळली.

First Published on: June 24, 2023 9:15 PM
Exit mobile version