कथित ऑडिओ क्लिपप्रकरणी संजय राऊतांवर अदखलपात्र गुन्हा दाखल

कथित ऑडिओ क्लिपप्रकरणी संजय राऊतांवर अदखलपात्र गुन्हा दाखल

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर कथित ऑडिओ क्लिपप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्यात आयपीसी ५०७ अंतर्गत राऊतांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मागील दोन दिवसांपासून सोशल मीडियावर फोनवरील संभाषणाची एक ऑडिओ क्पिल व्हायरल होतेय. या ऑडिओ क्लिपमध्ये एक व्यक्ती महिलेला शिवीगाळ करताना दिसत आहे. या ऑडिओ क्लिपमधला आवाज हा संजय राऊत यांचाच असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी आणि राऊतांवर कारवाई व्हावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली होती. त्याचप्रमाणे आता संजय राऊतांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

संजय राऊत यांनी बलात्कार आणि खुनाची धमकी दिल्याचा आरोप करत महिलेने मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात या महिलेने ईडीला साक्ष दिली होती, असा दावा महिलेकडून करण्यात आला आहे. तसेच महिलेने ती ऑडिओ क्लिपही पोलिसांना दिली आहे, ज्यामध्ये एक पुरुष महिलेशी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत आहे. १७ सेकंदाच्या या ऑडिओ क्लिपमध्ये तब्बल २७ वेळा शिवीगाळ करण्यात आली आहे.

या महिलेला काही झालं तर…

ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत शिवीगाळ करत धमकी देत आहेत. संजय राऊतांनी प्रसारमाध्यमांसमोर मलाही अनेकदा शिवीगाळ केली आहे. त्यामुळे मला काळजी वाटतेय. स्वप्ना पाटकर या महिलेच्या सुरक्षेसाठी मी मुंबई पोलिसांना विनंती केली आहे. या महिलेला काही झालं तर त्याला जबाबदार पोलीस असतील. पोलीस या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहणार असून स्वप्ना पाटकर यांना सुरक्षा देणार आहेत. माझी या प्रकरणी राज्य महिला आयोगासोबत बातचित झाली आहे, त्यामुळे त्यांनी या प्रकरणाची दखल घेतली पाहीजे, असं किरीट सोमय्या म्हणाले.

दरम्यान, संजय राऊत यांच्या कथित ऑडिओ क्लिपची राज्य सरकारने दखल घेतली आहे. तसेच पोलीस विभागाला या घटनेसंदर्भात गंभीरतेने दखल घेण्याचे राज्य सरकारने आदेश दिले आहेत.


हेही वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला रवाना, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होण्याची


 

First Published on: July 30, 2022 10:00 PM
Exit mobile version