दारूच्या नशेत भावजायीच्या छातीत खुपसला होता चाकू; अखेर कायदा ठरला सर्वश्रेष्ठ

दारूच्या नशेत भावजायीच्या छातीत खुपसला होता चाकू; अखेर कायदा ठरला सर्वश्रेष्ठ

नाशिक : मद्याच्या आहारी गेलेल्या आरोपीबरोबर भाऊ व त्याच्या पत्नीने वाद घातला. त्या रागातून आरोपीने भावजयीवर चाकू हल्ला केला त्यात तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. ही घटना २ जून २०२२ रोजी घडली होती. अनिल पांडुरंग पाटील (३७, रा. मोरे मळा, हनुमान वाडी, पंचवटी) असे आरोपीचे नाव आहे. ज्योती सुनील पाटील असे मृत भावजयीचे नाव आहे.

अभियोग कक्षाच्या माहितीनुसार व सुनील पाटील यांच्या फिर्यादीनुसार, मोरे मळा परिसरात पाटील कुटूंबिय राहत होते. काहीही कामधंदा न करणारा आरोपी अनिल यास मद्याचे व्यसन होते. २ जून २०२२ रोजी सायंकाळच्या सुमारास अनिल कपडे काढून जमिनीवर झोपलेला होता. त्यामुळे भावजयी ज्योती पाटील व भाऊ सुनील यांनी आरोपी अनिलला बडबड करीत रागावले. त्याचा राग आल्याने अनिलने शिवीगाळ करीत किचनमधून चाकू आणला व ज्योती यांच्या छातीत भोकसला. वर्मी घाव बसल्याने ज्योती गंभीररित्या जखमी झाल्या. त्यांना वाचविण्यासाठी सुनील धावला असता अनिलने त्यांच्यावरही हल्ला केला. यात सुनील जखमी झाले. घटनेनंतर अनिल फरार झाला होता. ज्योती यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून मयत घोषित केले.

याप्रकरणी सुनील पाटील यांच्या फिर्यादीनुसार, पंचवटी पोलीस ठाण्यात अनिल विरोधात खून व खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. तत्कालीन पोलीस निरीक्षक अशोक भगत व ए. एस. साखरे यांनी तपास करीत अनिल यास अटक केली. तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. दीपशिखा भिडे यांनी युक्तीवाद करीत १३ साक्षीदार तपासले. यात परिस्थितीजन्य पुरावे व साक्षीदारांच्या आधारे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांनी अनिल यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

First Published on: March 29, 2023 12:00 PM
Exit mobile version