सर्वतीर्थ टाकेद देवस्थान येथे भरदिवसा अंधश्रद्धेचा प्रकार; घटनेमुळे खळबळ

सर्वतीर्थ टाकेद देवस्थान येथे भरदिवसा अंधश्रद्धेचा प्रकार; घटनेमुळे खळबळ
नाशिक : इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद येथील सर्वतीर्थच्या कुंडावर भरदिवसा अंधश्रद्धेचा प्रकार समोर आला आहे. एक अनोळखी बाबा एका व्यक्तीच्या अंगा खांद्यावरून लिंबूचा उतारा करून ते लिंबू कापून ते कुंडावर फेकत असल्याचे निदर्शनास आले. यामुळे मंदिर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नेमका हा काय प्रकार आहे याबाबत उलटसुलट चर्चाना उधाण आले आहे.
पौराणिक महत्व असलेल तीर्थ स्थान म्हणून सर्वतीर्थ टांकेदची ओळख आहे. पौराणिक महत्व लक्षात घेता याठिकाणी देशभरातून हजारो भाविक येत असतात. त्यातच श्रावण महिन्यात भाविकांची संख्या वाढत असते. मात्र, अशा पद्धतीने अघोरी कृत्य होत असल्याने मंदिर परिसरात आणि भविकांमध्ये खळबळ उडाली आहे.
एक अनोळखी बाबा एका व्यक्तीच्या अंगा खांद्यावरून लिंबूचा उतारा करून ते लिंबू कापून ते कुंडावर फेकत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर कुंडावर आलेल्या भक्तांनी मंदिरतील महंतांना सगळी हकिगत सांगितली. महंतांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र हा बाबा तेथून काही हटला नाही. त्याने तेथे बिनदिक्कतपणे आपला टोटगा करण्याचा कार्यक्रम चालू ठेवला. यामुळे कुंडावर आलेले नागरिक भयभीत झाले. जेंव्हा स्थानिक पत्रकाराने व्हिडिओ काढला तेंव्हाही या बाबाने आपला बुवाबाजीचा कार्यक्रम सुरूच ठेवला. टोटगा पूर्ण झाल्यावर सर्व साहित्य तिथेच टाकून निघून गेला. दोन्ही इसम गावातील व परिसरातील नसल्याने अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

जादूटोणा कायद्यांतर्गत कारवाई व्हावी

सर्वतीर्थ टाकेद हे धार्मिक स्थळ असून त्या ठिकाणी अंधश्रध्देचा प्रकार घडण हे अत्यंत धोकेदायक व गंभीर आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती त्याचा निषेध करत आहे. खरतर करणी किंवा भानामती उतरविण्याच्या बहाण्याने त्या मांत्रिकाने त्याच्यावर जो उपचार केले ते जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंतर्गत गुन्हा ठरणारे आहे. तरी संबधिताना पकडुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाहक कृष्णा चांदगुडे यांनी केली आहे.
First Published on: September 2, 2023 7:47 PM
Exit mobile version