ई-श्रम पोर्टलवर वंचित घटकातील असंघटित कामगारांच्या नोंदणीला गती द्या; मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकरांचे निर्देश

ई-श्रम पोर्टलवर वंचित घटकातील असंघटित कामगारांच्या नोंदणीला गती द्या; मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकरांचे निर्देश

मुंबई – ‘ई-श्रम’ पोर्टलवर असंघटित कामगारांच्या नोंदणीला गती देऊन अधिकाधिक कामगारांची नोंदणी करण्यासाठी वंचित घटकांना प्राधान्य देण्यात यावे, यासाठी मत्स्यव्यवसाय, सहकार, समाजकल्याण, बृहन्मुंबई महापालिका यांच्याशी समन्वय साधण्याच्या सूचना मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी आज दिल्या.

मुंबई शहर जिल्ह्यातील असंघटित कामगारांची ‘ई-श्रम’ पोर्टलवर नोंदणी वाढविण्याच्यादृष्टीने उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय अंमलबजावणी समितीची बैठक आज संपन्न झाली. या बैठकीला उपजिल्हाधिकारी कल्याणराव पांढरे, सहायक कामगार आयुक्त सतिश तोटावार, प्रवीण कावळे, संगीता गायकवाड, लीना इंगळे आदी उपस्थित होते.

‘ई-श्रम’ पोर्टलवर असंघटित कामगारांच्या नोंदणीमध्ये मुंबई शहर जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर असून, सुमारे ४ लाख १० हजार ४८२ असंघटित कामगारांची नोंदणी झालेली आहे. सुमारे ६४ टक्क्यांपेक्षा अधिक हे प्रमाण असून नोंदणीची गती वाढविण्याच्यादृष्टीने असंघटित कामगारांची जागृती करण्यासाठी उपक्रम हाती घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी निवतकर यांनी दिल्या. प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेसाठी जे कामगार नोंदणी करतात, त्यांची नोंदणीसुद्धा ई-श्रम पोर्टलवर करता येणार असून, ‘आपले सरकार’ केंद्रांमध्येदेखील ही नोंदणी सुरू करण्यासाठी संबंधितांशी समन्वय साधण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

दिव्यांग, तृतीयपंथी आदी वंचित घटकांतील असंघटित कामगारांना नोंदणीत प्राधान्य देण्याबरोबरच गृहनिर्माण सोसायट्यांच्या माध्यमातून घरगुती कामगारांच्या नोंदणीला गती द्यावी, असे सांगून बृहन्मुंबई महापालिकेने प्रत्येक वॉर्डात भाजी बाजार, शाळा आदी ठिकाणी कायमस्वरुपी नोंदणी शिबिरे चालविण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी निवतकर यांनी शेवटी दिल्या.

First Published on: February 24, 2022 9:14 PM
Exit mobile version