एसटी आणि शिवशाहीमध्ये भीषण अपघात, ४० जखमी

एसटी आणि शिवशाहीमध्ये भीषण अपघात, ४० जखमी

एसटी बस आणि शिवशाहीमध्ये भीषण अपघात

पनवेल-अलिबाग मार्गावर कार्लेखिंडजवळ राज्य परिवहन मंडळाच्या शिवशाही आणि एसटी बसेसमध्ये समोरासमोर धडक होऊन गंभीर अपघात झाला. गुरूवारी सकाळच्या सुमारास हा मोठा अपघात झाला. या अपघातामध्ये आत्तापर्यंत दोन्ही बसमध्ये बसलेल्या प्रवाशांपैकी ४० प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. अपघात झाल्यानंतर प्रशासनाने आसपासच्या नागरिकांच्या मदतीने तातडीने जखमींना अलिबागच्या सिव्हिल रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. दरम्यान, या अपघातामध्ये एसटीचे चालक गंभीर जखमी झाले आहेत, अशी माहिती घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शींनी दिली. या दुर्घटनेचा तपास अलिबाग पोलिस करत आहेत.

दोन एसटी बसेस समोरासमोर धडकल्या

कसा झाला अपघात?

कार्लेखिंड परिसरात सकाळी ९.३० च्या सुमारास हा गंभीर अपघात घडला. राज्य परिवहन मंडळाची शिवशाही (बस क्रमांक – MH14 GD 8739) आणि एसटी (MH 14 BT 1877) या दोन्ही कार्लेखिंड परिसरात समोरासमोर आल्या. ‘शिवशाही’ बस मुरुडवरुन स्वारगेटच्या दिशेने जात होती. त्याच दरम्यान एसटी बस पनवेलवरुन अलिबागला येत होती. यावेळी कार्लेखिंड येथे ओव्हरटेक करताना शिवशाही बसने विरुद्ध दिशेने येणाऱ्या एसटी बसला धडक दिली.

दोन्ही बसेसचं मोठं नुकसान

एसटी चालक गंभीर जखमी, जे.जे. मध्ये उपचार

या अपघातात एसटी बसचे मोठे नुकसान झाले असून शिवशाही बसचेही काही प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, दोन्ही बसमधील मिळून ४० प्रवासी जखमी झाल्यामुळे प्रत्यक्षदर्शींकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याचप्रमाणे एसटी चालक के. एस. लहाणे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने मुंबईतील जे. जे. रूग्णालयात उपचारांसाठी हलवण्यात आले आहे.

अपघातात ४० प्रवासी जखमी

वाहतूक काही काळ विस्कळीत

दरम्यान, परिवहन प्रशासनाकडून हा अपघात नेमका कसा झाला? त्यावेळी नक्की काय घडले? याविषयी माहिती घेतली जात आहे. अपघातामुळे कार्लेखिंड परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र, आता हळूहळू वाहतूक पूर्वपदावर येत आहे.

आठवड्याभरात तिसरा अपघात

आठवड्याभरात एसटी अपघाताची ही तिसरी घटना असून, २१ जूनला ठाणे शहरातील सॅटिस पुलावर दोन एसटी बसची धडक झाल्याने २८ प्रवासी जखमी झाले होते. तर त्याच दिवशी रात्री नवी मुंबईतील सानपाड्याजवळ दुचाकीस्वाराला वाचवताना एसटीच्या शिवनेरी बसचा अपघात झाला होता. यात ५ प्रवासी किरकोळ जखमी झाले होते.

First Published on: June 28, 2018 12:09 PM
Exit mobile version