…तर गाडीच्या बाहेर फेकली गेल्याने बचावली चिमुकली

…तर गाडीच्या बाहेर फेकली गेल्याने बचावली चिमुकली

लातूर येथे अपघात

लातूरमध्ये लग्नाहून परतणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातला. त्यांच्या अॅपे मॅजिकची समोरून येणाऱ्या टेम्पोशी जोरदार टक्कर झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर सहा जण गंभीर जखमी आहेत. लातूर जिल्ह्यातील शिरुर ताजबंद ते मुखेड राज्य महामार्गावरील चेरापाटीनजीक काल, रविवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने या अपघातातून एक वर्षाची चिमुकली मॅजिकमधून बाहेर फेकली गेल्याने बचावली आहे. प्राची अरविंद सोनकांबळे असे त्या चिमुकलीचे नाव आहे.

धामणगाव येथील सोनकांबळे परिवार विळेगाव ता. अहमदपूर येथून लग्न आटोपून गावाकडे येत असताना जांबकडून शिरुर ताजबंदकडे जाणाऱ्या टेम्पोची समोरासमोर धडक होऊन हा अपघात घडला. हा अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये जीपमधील पाच वऱ्हाड्यांचा जागीच मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले. जखमींना जळकोटच्या ग्रामीण रुग्णालयात रात्री उपचार करून उदगीर येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे. मृतांमध्ये ज्ञानोबा सोनकांबळे (वय ४०), अरविंद सोनकांबळे (वय ३०), पुष्पा सोनकांबळे (वय ४५), कांताबाई सोनकांबळे (वय ५५), छकुली सोनकांबळे (वय ६) यांचा समावेश आहे तर आरुशी सोनकांबळे, दिनेश सोनकांबळे, बळीराम सोनकांबळे, सुनिता सोनकांबळे, रितेष सोनकांबळे, प्राचीन सोनकांबळे हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.

First Published on: May 6, 2019 10:53 AM
Exit mobile version