मला फाशी द्या…

मला फाशी द्या…

ठाणे । पोटच्या लग्न आणि १४ वर्षीय अल्पवयीन अशा दोन मुलींवर अत्याचार करत एकीला गरोदर करणाऱ्या नराधम ६० वर्षीय पित्याला ठाणे जिल्हा आणि अतिरिक्त सत्र ( विशेष पोक्सो) न्यायालयाच्या न्यायाधीश व्ही व्ही वीरकर यांनी शुक्रवारी दोषी ठरवत, दोन्ही वेगवेगळ्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. याचदरम्यान आरोपीने मला फाशीची शिक्षा दया अशी मागणी करत जन्मठेपेची शिक्षा झाल्याचा राग मनात धरून सरकारी वकील रेखा हिवराळे यांच्यावर ठाणे न्यायालयात न्यायाधीश आणि पोलिसांसमोर हल्ला चढवला. हा प्रकार शुक्रवारी सकाळ पावणे बाराच्या सुमारास घडला.

रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात २०१८ मध्ये आरोपीने आपल्या पोटच्या दोन मुलींवर अत्याचार केला. त्यातील एका गरोदर केल्याप्रकरणी पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल झाला होता. याचा तपास पूर्ण झाल्यावर रबाळे एमआयडीसी पोलिसांनी ठाणे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले. हा खटला न्यायाधीश व्ही व्ही वीरकर यांच्या समोर आल्यावर सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी सादर केलेले पुरावे आणि साक्षीदारांची साक्ष ग्राह्य मानून त्या नराधम पित्याला शुक्रवारी न्यायाधीश वीरकर यांनी दोन्ही गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच दोन्ही गुन्ह्यात प्रत्येकी दहा हजार दंड ठोठावला असून दंड न भरल्यास प्रत्येकी १०० दिवस साधी कैदेची शिक्षा भोगावी लागेल असे आदेशही दिले आहेत.

दरम्यान, आरोपीच्या वकील गीता गायकवाड यांनी आरोपीला दोन्ही गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा सुनावली असल्याचे त्यास सांगितले. त्यामुळे आरोपीने शिक्षा लागल्याचे समजल्यानंतर त्याने रागाच्या भरात ‘मला फाशीच दयायची होती ना बोलून त्याचे पुढे असलेल्या सरकारी वकील हिवराळे यांच्या अंगावर धावून जाऊन खांदयाला हाताने ठोसा मारला. हा प्रकार शुक्रवारी सकाळी पावणे बाराच्या सुमारास घडला.

” आरोपीला शिक्षा झाल्यावर त्याने त्याचा राग मनात धरून न्यायालयातच आरोपीने अचानक आपल्यावर हल्ला केला. या अचानक घडलेल्या प्रकाराने आपला बीपी वाढल्याने तातडीने आपणास खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. तसेच या झालेल्या प्रकाराप्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार दिली आहे. ”

– रेखा हिवराळे, सरकारी वकील, ठाणे जिल्हा व सत्र न्यायालय

First Published on: December 30, 2022 8:45 PM
Exit mobile version