संगमनेरमध्ये ५ कत्तलखान्यांवर छापे; ६२ लाखांचे गोमांस जप्त

संगमनेरमध्ये ५ कत्तलखान्यांवर छापे; ६२ लाखांचे गोमांस जप्त

संगमनेर – शहरातील पाच अवैध कत्तलखान्यांवर छापे टाकत पोलिसांनी तब्बल ६२ लाख रुपयांचे ३२ हजार किलो गोमांस जप्त केले. या छाप्यात ७१ जिवंत गोवंश जनावरांची सुटका केली. पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करत दोघांना पोलिसांनी अटक केली. जिल्ह्यातील गोमांस कत्तल आणि तस्करीचा उद्योग किती मोठ्या प्रमाणावर फोफावला आहे, हेदेखील या कारवाईतून पुढे आले आहे.

संगमनेर शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी संगमनेर येथील अवैध कत्तल खाण्याची माहिती भिवंडीच्या प्राणी कल्याण अधिकारी यतीन कांतिलाल जैन यांना दिली होती. जैन यांनी नगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना संपूर्ण माहिती देत कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर पाटील यांनी श्रीरामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील, विजय करे आणि संगमनेरचे पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख यांना जैन यांच्यासह घटनास्थळी जावून कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार नगर, श्रीरामपूर आणि संगमनेरमधील १०० पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. त्यात भारतनगर आणि जमजम कॉलनी परिसरातील साखळी कत्तलखान्यांवर एकाचवेळी छापे टाकण्यात आले. त्यामुळे कत्तखान्यांच्या मालकांना पळता भुई थोडी झाली.

पोलिसांची चाहूल लागताच अनेक कत्तलखान्यांचे मालक कुलूप लावून कामगारांसह फरार झाले. मात्र, पोलिसांनी दरवाजे तोडून कारवाई केली. प्रत्येक कत्तलखान्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मांस, रक्ताचा सडा आणि बांधलेली जनावरे असे दृश्य होते. या कारवाईत पोलिसांनी वाहीद कुरेशी, मुद्दत्सर हाजी, नवाज कुरेशी, जहीर कुरेशी, परवेझ कुरेशी, नवाज कुरेशी यांच्या कत्तलखान्यांसह कार्यालयांवर छापे टाकत रोकड, गोमांस आणि जिवंत जनावरे, वाहतुकीसाठीची वाहने असा १ कोटींहून अधिक किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. तर, परवेज कुरेशी कलीम सलीम खान, अबी दुरहक अब्दुल जबर या दोघांना अटक केली.

स्थानिक पोलीस गाफील कसे?

शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर कत्तलखाने सुरू असताना स्थानिक पोलीस गाफील कसे, असा प्रश्न आता या कारवाईने उपस्थित झाला आहे. शहरातील जमजम कॉलनी, जोर्वे रोड, भारत नगर, कोल्हेवाडी रोड परिसरात मोठ्या प्रमाणावर कत्तलखाने आहेत. या ठिकाणी जनावरांची सर्रास कत्तल होते. मात्र, स्थानिक यंत्रणा त्याकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे

First Published on: October 3, 2021 10:14 PM
Exit mobile version