शिवसेना-भाजपने एकत्र यायलाच हवं, मध्यस्थीसाठी मी तयार – विक्रम गोखले

शिवसेना-भाजपने एकत्र यायलाच हवं, मध्यस्थीसाठी मी तयार – विक्रम गोखले

vikram gokhale passed away in pune cm eknath shinde devendra fadanvis uddhav thackeray paid tribute

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या कारणाकरिता शिवसेना स्थापन केली. त्या बाळासाहेबांच्या मनाला किती यातना होत असतील याचा प्रत्यय मला आहे. सध्याचं जे गणित आहे ते चुकलेलं आहे. हे सुधारायचं असेल तर शिवसेना आणि भाजप एकत्रं आल्याशिवाय पर्याय नाहीच. हे दोन पक्ष एकत्र येण्यासाठी मध्यस्थी करायला देखील तयार आहे, असं मत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी व्यक्त केलं आहे.

विक्रम गोखले यांचा ७५ व्या वाढदिवसानिमित्त ब्राह्मण महासंघाच्या वतीनं रविवारी सन्मान करण्यात आला. यावेळी विक्रम गोखले यांनी माध्यमांशी संवाद साधताना शिवसेना-भाजप युतीवर भाष्य केलं. “बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या कारणाकरिता शिवसेना स्थापन केली. त्या बाळासाहेबांच्या मनाला किती यातना होत असतील याचा प्रत्यय मला आहे. माझी सख्खी आत्या सासू ही बाळासाहेबांच्या महिला आघाडीची पहिला महिला प्रमुख होती. बाळासाहेब माझे मामेसासरे. बाळासाहेबांची भाषणं ऐकून महाराष्ट्र गेली ४० वर्ष तृप्त झाला. मात्र, त्यांच्या निधनानंतर राजकारणात जे खेळ सुरु चालू आहेत ते इतके विचित्र स्तरावर पोहोचले आहेत, त्यात महाराष्ट्रातले लोक भरडले जात आहेत. याची कल्पना तुम्हाला नाही आहे, प्रसारमाध्यमांना नसते. हे गणित चुकलं आहे. हे सुधारायचं असेल तर अजून वेळ गेलेली नाही. ज्या संकटाच्या कड्यावरती आपला देश उभा आहे, त्यातून मागे खेचायचा असेल तर भाजप-शिवसेनेने एकत्र आलंच पाहिजे. भाजप-शिवसेनेने एकत्र आणण्याचे माझे प्रयत्न आहेत,” असं विक्रम गोखले म्हणाले.

पुढे बोलताना त्यांनी मी यासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो असल्याचं गोखले म्हणाले. “शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर तुमचं काय बिघडलं असतं, असा सवाल मी फडणवीसांना केला होता त्यावर फडणवीसांनी झाली चूक असं उत्तर दिलं,” असं विक्रम गोखले यांनी सांगितलं.

देश कधीही हिरवा होणार नाही

लाल बहादूर शास्त्री सोडून आतापर्यंत देशातील सर्व पंतप्रधानांना मी शंभराच्या खाली गुण देतो. पण त्यांची जयंती ही २ ऑक्टोबर ला येते ती हेतुपुरस्सर पुसली जाते. त्याचा विसर पाडला जातो. किती वर्षे कारस्थान आहे? हा देश कधीही हिरवा होणार नाही हा देश भगवा राहिला पाहिजे, असं वक्तव्य विक्रम गोखले यांनी म्हटलं.

शाहरुख माझं वाकडं करू शकत नाही

विक्रम गोखले यांनी आर्यन खान प्रकरणावरही भाष्य केलं. मी अत्यंत स्पष्ट सांगतो. शाहरुख खान आणि आर्यन माझं काहीही वाकडं करू शकणार नाही. देशाच्या बॉर्डरवर २१ वर्षाचा जवान गोळी लागून मरतो तेव्हा तो खरा हिरो असतो. आर्यन हिरो नाही, असं विक्रम गोखले म्हणाले.

 

First Published on: November 14, 2021 3:52 PM
Exit mobile version