आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर, पांजरापोळलाही भेट देण्याची शक्यता?

आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर, पांजरापोळलाही भेट देण्याची शक्यता?

नाशिक : नाशिकची ऑक्सिजन फॅक्टरी म्हणून ओळख असलेल्या चुंचाळे शिवारातील पांजरापोळच्या नैसर्गिक जैवविविधता असलेल्या ८२५ एकर जागेवर औद्योगिक आरक्षणाच्या प्रस्तावाबाबत प्रशासनाकडून सर्वेक्षण करण्यात येत असून येत्या दोन तीन दिवसांत यासंदर्भातील अहवाल जिल्हाधिकार्‍यांना सुर्पूत केला जाणार आहे. दरम्यान शिवसेना युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे पांजरापोळला भेट देण्याची शक्यता असून शिवसेनेने पांजरापोळच्या जागेवर उद्योगांसाठी भूसंपादनास विरोध दर्शवला आहे. त्यामुळे बारसू नंतर नाशिकमध्येही भूसंपादनाचा मुददा तापण्याची शक्यता आहे.

पांजरापोळ येथील जमीन औद्योगिक क्षेत्रासाठी संपादित करावी, अशी मागणी भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी केली आहे. शहरापासून जवळच असलेल्या चुंचाळे शिवारातील पांजरापोळची जागा हे नैसर्गिकदृष्ट्या महत्वाचे ठिकाण आहे. याठिकाणी भारतीय प्रजातीची असंख्य झाडे आहेत. वन्यजीव प्राणी, पक्षी, नैसर्गिक तळे, कुंड, सेंद्रिय शेती, पाळीव जनावरे अशी खूपच मोठी पर्यावरणीय संसाधने आहेत. एकिकडे नाशिकची ओळख थंड हवेचे ठिकाण अशी आहे. त्याला कुठेही बाधा नको, तसेच हे नैसर्गिक संतुलन टिकविणे अवश्यक आहे.

उद्योग व्यवसाय हा कोरडवाहू क्षेत्र किंवा औद्योगिक क्षेत्रातील राखीव क्षेत्र येथे उद्योग आणावेत म्हणजे रोजगार वाढेल. परंतु, यासाठी बहरलेली नैसर्गिक संपदा नष्ट करू नये अशी पर्यावरणप्रेमींची मागणी आहे. या जागेच्या भूसंपादनासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी समिती गठित केली असून समितीने सर्व्हेक्षण पूर्ण केले असून याचा अहवाल येत्या दोन ते तीन दिवसांत सादर करण्यात येणार आहे.

भूमिकेकडे लागले लक्ष्य

रत्नागिरीतील बारसू रिफायनरी प्रकल्प वादात सापडला आहे. ठाकरे गटाने प्रकल्पाला विरोध करणार्‍या स्थानिकांना पाठिंबा दिला आहे. आता नाशिकमध्येही पांजरापोळच्या जागेवरील औद्योगिक भूसंपादनाच्या शासनाच्या भूमिकेबाबत आदित्य ठाकरे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वीदेखील मायको सर्कल ते उंटवाडी दरम्यानच्या उडडाणपूलाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जाणार होती. त्यावेळीही तात्कालीन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी नाशिकमध्ये धाव घेत ही वृक्षतोड थांबवली होती. ब्रह्मगिरी येथील अवैध उत्खननाबाबतही त्यांनी लक्ष घातले होते. आता पांजरापोळच्या जागेबाबतही शिवसेनेने लक्ष घातले असून आगामी काळात हा मुददा तापण्याची शक्यता आहे.

First Published on: May 16, 2023 12:54 PM
Exit mobile version