विरोधी पक्ष हेल्थ आणि डिझास्टर टुरिझममध्ये व्यस्त; आदित्य ठाकरेंची टीका

विरोधी पक्ष हेल्थ आणि डिझास्टर टुरिझममध्ये व्यस्त; आदित्य ठाकरेंची टीका

आदित्य ठाकरेंचा विरोधकांना टोला

आम्ही फोन, व्हिडीओ कॉन्फरन्सिंग आणि जिल्हा निहाय बैठकांद्वारे लोकांची मदत कशी करता येईल यावर लक्ष केंद्रित करत असून विरोधी पक्षातील काही मंडळी हि हेल्थ आणि डिझास्टर टुरिझमसाठी फिरत असल्याची टिका पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे. एमएमआर रिजनमधील कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी आणि मिरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील कोरोना परिस्थितीची आढावा बैठक आदित्य ठाकरे यांनी कल्याण मधील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे घेतली यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही टीका केली.

मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कशाप्रकारे काम सुरू आहे याचा उहापोह आम्ही या बैठकीत केला. लोकांना कोरोनाच्या प्रादुर्भावापासून मुक्त ठेवून फिट कसे ठेवता येईल याचे मुख्य आवाहन आहे. हाताबाहेर गेलेली कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी महत्वाची भूमिका बजवणारे धारावी मॉडेलचे किरण दिघावकरही या बैठकीला उपस्थित होते. एमएमआर रिजनमध्ये वाढणाऱ्या कोरोनाला अटकाव करण्यासाठी प्रशासकीय प्रतिसाद आणि मेडीकल इमर्जन्सी हे दोन महत्वाचे घटक असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. तर याठिकाणी आम्ही जम्बो बेड्सची सुविधा, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, ऍम्ब्युलन्स आदींची सुविधा वाढवत आहोत. मुंबईप्रमाणे इकडेही अधिकाधिक लोकांपर्यंत कसे पोचता येईल याचाही विचार या बैठकीत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान काही दिवसांपूर्वी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण डोंबिवलीतील तोकड्या आरोग्य यंत्रणेवर बोट ठेवत टिका केली होती. त्याबाबत बोलताना आदित्य ठाकरे यांनी सांगितले की विरोधी पक्ष हेल्थ आणि डिझास्टर टूरिजम करत आहे. तर आम्ही मात्र लोकांची मदत कशी करता येईल याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. राज्याचे बरे वाईट झाले तर आनंद होणारा हा जगातील एकमेव विरोधी पक्ष असल्याची टिकाही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली. तसेच आम्ही जशी लोकांची काम करत आहोत, त्याप्रमाणे तुम्हीही करा असेही त्यांनी यावेळी सांगितले. तर हे जगातील सर्वात मोठे पॅनडेमिक असून एका शहरापूरता मर्यादित नाहीये. विरोधी पक्षाने कन्स्ट्रकटिव्ह क्रीटीसीजम करावे, इतर राज्यात जाऊन तिकडचा वैद्यकीय प्रतिसाद बघावा, आम्ही कोणावरही दोष न देता काम करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

बैठकीनंतर आदित्य ठाकरे यांनी लाल चौकी येथील पालिकेच्या आरक्षित इमारतीत उभारण्यात येत असलेल्या कोवीड रुग्णालयाची पाहणी देखील केली. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांच्यासह इतर महापालिकेचे आयुक्त आणि अधिकारी वर्ग उपस्थित होता. तर या बैठकीला कल्याणला येण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी स्वतः गाडी चालवत कल्याण गाठले व जाताना देखील स्वतः गाडी चालवत मुंबईला रवाना झाले.

First Published on: July 11, 2020 8:34 PM
Exit mobile version