आदित्योदयामुळे सेनेच्या पाच नेत्यांचा सेन्सेक्स घसरला

आदित्योदयामुळे सेनेच्या पाच नेत्यांचा सेन्सेक्स घसरला

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेला उतरण लागली आणि महाराष्ट्रासह हरयाणातही भाजपचे विधानसभा निवडणुकीत संख्याबळ घटले. राजकीय सारीपाटावरची प्यादी गडगडल्याने गुरुवारी शेअर बाजारातील निर्देशांक (सेन्सेक्स) ४० अंकांनी घसरला. राज्यात भाजपच्या ताकदीत चिंताजनक घट झाली आणि शिवसेनेला विलक्षण महत्त्व प्राप्त झाले. त्याचवेळी सेनेत ‘आदित्योदय’ झाल्यामुळे मातोश्रीवरील मिलिंद नार्वेकर, एकनाथ शिंदे,संजय राऊत, सुभाष देसाई आणि अनिल देसाई यांचा ‘भाव’ही गडगडला आहे. याच नेत्यांच्या चाणक्य नितीने गेल्या १५ वर्षांत उद्धव ठाकरेंना कौतुकास्पद राजकीय यश मिळवून दिलेले आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या मागे ईडी आणि पक्षफुटीच्या भितीने फरफटत जाणारी शिवसेना निकालानंतर मात्र ‘किंगमेकर’च्या भूमिकेत गेली आहे. या निवडणुकीत पहिल्या ठाकरेंनी आमदार होण्याची किमया साधली आहे. त्याचाही विशेष आनंद ‘मातोश्री’ला झाला आहे. शिवसेनेत ’आदित्योदय’ झाल्यानंतर पक्षाच्या आंदोलनांपासून ते प्रचारापर्यंत सारे काही ‘ब्रॅण्डेड’ करण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. त्यामुळे पारंपारिक पण शिवसैनिकांना भावणारी प्रचार यंत्रणा असो की नेते, सगळ्यांनाच अडगळीत टाकून ‘टीम आदित्य’ने युवराजांची आणि त्यांच्या भावी वाटचालीची सूत्रे हाती घेतली आहेत.यात आदित्य यांचा मावसभाऊ वरुण सरदेसाई, प्रियांका चतुर्वेदी, सचिन अहीर, अमोल किर्तीकर आणि सुरज चव्हाण यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

सेनेला सत्तेत अव्वल करण्यासाठी याच टीमच्या माध्यमातून निवडणूक रणनीतीकार बिहारी प्रशांत किशोर यांना डोळे दीपवणारी बिदागी देऊन पाचारण करण्यात आले होते. पण मराठी मुलूख आणि शिवसेनेचा मतदार यांची नस प्रशांत किशोर यांना पकडताच आली नाही.सेनेच्या अनेक बाबतीत किशोर यांनी गोंधळ घातला नसता तर पक्षाने पंच्याहत्तरी गाठली असती इतके पोषक वातावरण सेनेसाठी होते. पहिल्या ठाकरेंनी आमदार होण्यासाठी इव्हेंट मॅनेजमेंट टीम वरळीत उतरवून ‘केम छो वरली’ करण्यात आले. तर तामिळींसाठी आदित्य यांना लुंगी नेसवण्यात आली.

त्यामुळे सेनेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना शिवसेना नेटकर्‍यांकडून आदित्य यांच्या आवडत्या सोशल मीडियावर शेकून निघाली. आणि रातोरात भाडोत्री कल्पनाकारांना गाशा गुंडाळून जावे लागले.

दुसरीकडे माजी आमदार सुनिल शिंदे आणि विभागप्रमुख आशिष चेंबूरकर यांच्या आपआपसातील लाथाळ्यांमुळे राष्ट्रवादीत पक्षीय पातळीवर सपशेल अपयशी ठरलेल्या सचिन अहीर यांनी वरळीचा सातबारा पक्षप्रमुखांकडून स्वत:च्या नावावर करुन घेतला. निष्ठावंत आणि नवसैनिक यांच्यात घोळ घालणार्‍या सचिन अहिर यांना आदित्य आणि मातोश्रीने दिलेल्या विशेष प्रेमामुळे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते आणि नेतेही चक्रावले आहेत. वरळीत झालेल्या प्रचाराचा आणि निवडणूक कामाच्या गोंधळाचा फटका आदित्य ठाकरेंच्या मताधिक्क्याला बसला. या सगळ्यांपासून दूर राहण्याचा शक्य तितका प्रयत्न खासदार अरविंद सावंत यांनी केला.सावंतांच्या अलिप्ततेबाबतही सेनेत नाराजी व्यक्त होत आहे.

नारायण राणे यांना २००५ साली पक्षातून काढून टाकल्यावर सेनेचा संक्रमणकाळ सुरू झाला.अनेक राजकीय पंडितांनी सेना संपणार असा सूर काढला. मिलिंद नार्वेकर-सुभाष देसाई या जोडीने कान भरवल्याने राणे-राज ठाकरे हे पक्षाबाहेर गेल्याची सार्वत्रिक भावना झाली. राज ठाकरे बाहेर गेल्यावर स्व.शिवसेनाप्रमुखांनी त्यांच्याच मालकीच्या बंगल्यात नार्वेकर यांचा दु:श्वास सुरू केला. मात्र फक्त उद्धवहित पाहणार्‍या नार्वेकर यांनी, वेळोवेळी पक्षप्रमुखांना अपेक्षित अनेक घटकांना दुखावून अंगावर घेतले. त्यानंतर त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली. मात्र त्यानंतरही उपयुक्तता ओळखून शिवसेनाप्रमुखांना नावडत्या असलेल्या नार्वेकर यांना उद्धव यांनी अंतर दिले नाही.सुभाष देसाई आणि अनिल देसाई हे दोन्ही नेते तिन्ही पिढ्यांशी उत्तम समन्वय साधून आहेत.सुभाष देसाई यांच्या नेटक्या नियोजनाचा दरारा पक्षात आदराने चर्चिला जातो. तर अनिल देसाई यांच्या ‘येस बॉस’ पद्धतीमुळे त्यांना खासदारकी आणि दिल्ली जबाबदारी देण्यात आली. ज्येष्ठ खासदार आणि संपादक संजय राऊत यांनी ‘सामना’तून केलेली कामगिरी अनेकांना रुचत नसली तरी उद्धव यांच्या यशात ती दुर्लक्षून चालणारी नाही.

आनंद दिघेंच्या निधनानंतर ठाण्याचा गड अभेद्य ठेवून स्वत:ची संसदीय कामगिरी उंचावताना राज्यभरातील सामान्य शिवसैनिकांची पसंती मिळवणार्‍या एकनाथ शिंदे यांनी गेल्या काही वर्षांत मातोश्रीची मर्जी संपादन केली. त्यामुळेच निवडणुकीपूर्वी राज्यभरातील आदित्य यांच्या संवादयात्रेत शिंदे यांचा सहभाग लक्षणीय होता. निवडणुकीची उमेदवारी, वाटाघाटी आणि उमेदवार निवड यात शिंदेंचा सहभाग होता. मात्र प्रदीप शर्मा, रमेश पाटील, दीपाली सय्यद, विलास तरे, पांडुरंग बरोरा अशा उमेदवारांच्या झालेल्या पराभवामुळे शिंदेशाहीचा भाव गडगडला आहे. मात्र यावरील नेत्यांची कामगिरी सातत्यपूर्ण असतानाही ‘टीम आदित्य’ विशेषतः सरदेसाई-अहीर या बिनीच्या शिलेदारांना अडगळीत टाकण्याची व्यूहरचना करण्यात व्यस्त आहे. यावर प्रतिक्रिया देताना आधी राज्यात आणि मग राष्ट्रीय राजकारणात स्थिरावलेला नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर म्हटले की, “पक्षप्रमुख उद्धवजींनी मोठ्या साहेबांचे सहकारी आणि आपले सहकारी यांचा नीट मेळ घातला, त्यामुळे पक्ष फिनिक्स पक्ष्यासारखा झेपावू शकला. शिवसेना नव्या वळणावर असताना तसे झाले तरच भाजपसमोर निभाव लागेल.’’

टीम आदित्य ः वरुण सरदेसाई, प्रियांका चतुर्वेदी,
सचिन अहीर, अमोल किर्तीकर आणि सुरज चव्हाण

मिलींद नार्वेकर घसरले, वरूण सरदेसाई वधारले
निष्ठावंत शिवसेना नेत्यांची टीम अडगळीत

First Published on: October 26, 2019 6:27 AM
Exit mobile version