महिलेच्या आत्महत्येनंतर मुख्यमंत्र्यांनी काढले ‘हे’ आदेश

महिलेच्या आत्महत्येनंतर मुख्यमंत्र्यांनी काढले ‘हे’ आदेश

मुंबई : मंत्रालयात सोमवारी (२७ मार्च) आपल्या कामाची दाद मागण्यासाठी आलेल्या तीन जणांनी विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यातील एका महिलेचा मंगळवारी (२८ मार्च) उपचारादरम्यान मृत्यू झाला असून एका महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे राज्य सरकार खडबडून जागे झाले असून त्यांनी सर्व मंत्र्यांना आदेश दिले आहेत की, सामान्य नागरिकांना कधी आणि किती वाजता भेटणार याबाबत माहीती मंत्रालयातील दालनाबाहेर एका फलकावर लिहा. याशिवाय विभागीय पातळीवरील अधिकाऱ्यांनी आठवड्यातून किमान दोन दिवस निश्चित करून वेळ राखून ठेवावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे असलेल्या सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी संध्याकाळी परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार मंत्र्यांनी कामाचे स्वरूप लक्षात घेऊन सामान्य जनतेला भेटी देण्यासाठी आठवडा, पंधरवडा व महिना यातील ठराविक दिवस तसेच वेळ निश्चित करावी. तसेच मंत्री जनतेला कधी भेटणार हे कळण्यासाठी भेटीचा दिवस व वेळेची माहिती देणारा फलक मंत्रालयातील दालनाबाहेर लावावा. याशिवाय सामान्य जनतेला रिकाम्या हाताने परत जाण्याची वेळ येऊ देऊ नका, असे निर्देश सामान्य प्रशासन विभागाकडून देण्यात आले आहेत.

बोगस कागदपत्रांच्या मदतीने प्लॉट विकल्याचे प्रकरण
मृत्यू झालेल्या शीतल यांच्या पतीच्या नावे धुळे एमआयडीसीमध्ये प्लॉट होता. हा प्लॉट एमआयडीसीतील अधिकाऱ्यांनी २०१० मध्ये बोगस कागदपत्रांच्या मदतीने दुसऱ्या व्यक्तीला विकल्याचा त्यांचा दावा होता. याप्रकरणी दाद मागण्यासाठी त्या मंत्रालयात आल्या, मात्र मंत्रालयातील विभागाच्या मंत्र्यांकडून कोणतीच दाद न मिळाल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. पोलिसांनी तात्काळ त्यांना जे.जे. रुग्णालयात उपचारासाठी हलवले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत्यू घोषित केले.

पतीच्या उपचाराप्रकरणी डॉक्टरांवर कारवाईची मागणी
प्रकृती चिंताजनक असलेल्या संगीता डवरे यांचे पती नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या पतीचा अपघात झाला आणि जखमी पतीवर रुग्णालयातील डॉक्टरांनी योग्य ते उपचार न केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी त्यांनी तक्रार नोंदवली होती. मात्र कारवाई होत नसल्याने त्या मंत्रालयात आल्या आणि इथेही त्यांना दाद न मिळाल्याने त्यांनी विष प्राशन केले. त्यांच्यावर सध्या जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

अपंगांच्या अनुदानात वाढ करण्यासाठी
अपंगांच्या अनुदानात वाढ व्हावी यासाठी मंत्रालयात आलेल्या रमेश मोहिते यांनी अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. रमेशन मोहिते हे पुण्याच्या मावळ तालुक्यातील आहेत.

महिलेच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्र्यांकडून आदेश
सोमवारी दोन महिलांनी विष्य केल्यानंतर एका महिलेचा मृत्यू झाला आहे, तर एका महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे सामान्य प्रशासन विभागाकडून जनतेसाठी वेळ निश्चित करण्यात आली आहे. मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दुपारी ३ ते ४ ही वेळ सामान्य जनतेच्या भेटीसाठी राखून ठेवावी आणि या कालावधीत विभागाच्या बैठका घेऊ नयेत, असे आदेशही देण्यात आले आहेत. याशिवाय विभागीय पातळीवर शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी जनतेसाठी आठवड्यातून किमान दोन दिवस निश्चित करावे. तसेच मंत्र्यांनी अशा पद्धतीने दौरे निश्चत करावे जेणेकरून लोकांच्या भेटीवर परिणाम होणार, असेही विभागाकडून सांगण्यात आले आहेत.

 

First Published on: March 29, 2023 8:36 AM
Exit mobile version